आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर न्यायालयीन कचाट्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - भातकुली तालुक्यातील रेशन कार्डधारकांना पुरवण्यात येणारी साखर न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे. पुरवठादार सुमीत ट्रेडिंग कंपनीने दाखल केलेल्या याचिकेअंती न्यायालयाने ‘स्टेटस् को’(‘जैसे थे’ स्थिती) जारी केला. त्यामुळे पर्यायी व्यवस्था केल्याखेरीज भातकुलीवासीयांना दिवाळीपूर्वी साखर मिळणे अवघड झाले आहे.

प्रशासनाकडे साठवणुकीची व्यवस्था नसल्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी ‘नॉमिनी’ची व्यवस्था करण्यात आली आहे. नेमून दिलेल्या कारखान्यातून साखरेची उचल, त्याची साठवणूक व त्यानंतर दुकाननिहाय वितरण ही सर्व कामे त्यांना सांभाळावी लागतात. भातकुली तालुक्यासाठी राजकुमार आहूजा यांच्या सुमीत ट्रेडिंग कंपनीची नॉमिनी म्हणून निवड झाली होती. मात्र, निवड प्रक्रियेत आपल्याला डावलले गेले, असा आरोप करीत त्यांचे प्रतिस्पर्धी सतिकृपा प्रोव्हिजन्सचे मितेश अग्रवाल यांनी थेट मंत्रालयात धाव घेऊन नॉमिनी म्हणून स्वत:ची निवड करून घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने इतर सोपस्कार पार पाडून
भातकुली तालुक्याला साखर पुरवठा करण्यासाठी सतिकृपा प्रोव्हिजन्सला आवश्यक ते निर्देश दिले. मात्र, दरम्यानच्या काळात सुमीत ट्रेडिंग कंपनीने न्यायालयात धाव घेतली. 21 ऑक्टोबरला त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट केले. त्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने या प्रकरणात ‘स्टेटस् को’ दिला. परिणामी, पुढील सर्व घडामोडींना आपोआपच ‘ब्रेक’ लागला. या कायदेशीर घडामोडींमुळे भातकुली तालुक्यातील रहिवाशांना दिवाळीच्या तोंडावर साखर मिळणे अवघड झाले आहे.

..म्हणूनच शिवसेनेचे आंदोलन : रेशनधारकांना साखर उपलब्ध न झाल्यामुळेच शिवसेनेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. अमरावती, भातकुलीसह अनेक तालुक्यांत रेशनची साखर उपलब्ध नाही, असा सेनेचा आरोप आहे. परंतु, अमरावती शहरातील 270 पैकी दीडशेवर दुकानांमध्ये साखर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले असून, भातकुलीसाठी पर्यायी व्यवस्थेचा पर्याय अंमलात आणणार असल्याचे म्हटले आहे.