आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supply Officer's Office Broken , Deepostave Slow Down

पुरवठा अधिकार्‍यांच्या कार्यालयात तोडफोड, दीपोत्सवाच्या गोडव्याला ग्रहण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दीपोत्सवाच्या काळातही रेशनकार्डधारकांना साखर मिळाली नसल्याच्या मुद्दय़ावर शिवसैनिकांनी गुरुवारी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या कार्यालयात तोडफोड केली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. अधिकार्‍यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

दिवाळीच्या आधी साखरेचे वितरण केले जाईल, असे यापूर्वीच सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात अद्याप साखर मिळाली नसल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी गुरुवारी जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र चांदूरकर यांच्या कार्यालयात धडक दिली. त्या वेळी ते उपस्थित नव्हते, तर कार्यालय अधीक्षकाच्या प्रभारासह आणखी दोन पदभार असलेल्या शरयू आडे दुसर्‍या विभागात होत्या. परिणामी, संतप्त शिवसैनिकांनी चांदूरकर यांच्या कक्षाचे दार फोडले. त्यांची रिकामी खुर्ची कार्यालयाबाहेर फेकली. माहिती मिळताच गाडगेनगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या तक्रारीवरून या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी दिगंबर डहाके यांच्यासह नऊ जणांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान, शासकीय कामात व्यत्यय, जमाव करणे तसेच मुंबई पोलिस कायद्याच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती गाडगेनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांनी दिली. जिल्हाधिकारी राहुल महिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंह पवार व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले.
साखरेचे वाटप अद्याप नाहीच
जिल्हाधिकार्‍यांचे म्हणणे खोटे आहे. अनेक ठिकाणी रेशनची साखर पोहोचलीच नाही. जिल्हा पुरवठा कार्यालयातील अधिकार्‍यांनी हे मान्य केले आहे. हे आंदोलन सामान्यांसाठी होते. साखर मिळणार नसेल,तर दिवाळी साजरी कशी करायची? दिगंबर डहाके, महानगरप्रमुख, शिवसेना

तोडफोड करणे गंभीर प्रकार
साखरेचे वाटप जिल्हाभर सुरू आहे. कुठे कमी-जास्त प्रमाण झाले असेल. याचा अर्थ साखरेचे वितरण झालेच नाही, असे नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड करणे हा गंभीर प्रकार आहे. निवेदन, चर्चा, मोर्चा हे सनदशीर मार्ग आहेत. मात्र, ते सोडून अशा प्रकारचे वर्तन करणे योग्य नाही. राहुल महिवाल, जिल्हाधिकारी