आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यातही ताडोबा अंशत: खुले राहणार, पर्यटकांच्या मागणीवर वन विभागाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पर्यटकांनी केलेल्या मागणीनुसार विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प आता पावसाळ्यातही अंशत: सुरू ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. प्रकल्पाचे मोहर्ली गेट पर्यटकांसाठी खुले ठेवले जाण्याची शक्यता आहे.
निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प लोकप्रिय आहे. या व्याघ्र प्रकल्पात वाघांचे दर्शन होत असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक त्याकडे आकर्षित होतात. पावसाळ्यात दोन महिन्यांसाठी मात्र हा व्याघ्र प्रकल्प बंद ठेवला जातो. तथापि, ताडोबातील पर्यटन पावसाळ्यातही सुरू ठेवावे, अशी मागणी पर्यटकांकडून होत होती. त्यानुसार गेल्यावर्षी पहिल्यांदाच प्रकल्प अंशत: सुरू ठेवला होता. मात्र, ते मोठ्या प्रमाणावर जाहीर केले नव्हते. त्यामुळे यावर्षी वन विभाग काय निर्णय घेणार, याकडे पर्यटकांचे लक्ष लागले होते. वन विभागानेही प्रकल्प काही प्रमाणात सुरू ठेवण्याची शिफारस केली होती. ती वन मंत्रालयाने मान्य केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या प्रकल्पास भेट देणाऱ्या पर्यटकांना अंशत: पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी निर्णय घेतला जाणार असला तरी ताडोबातील मोहर्ली व नवेगाव असे दोन गेट सुरू ठेवले जातील, असे सूत्रांनी सांगितले. रोज पर्यटकांच्या किमान २० गाड्या प्रकल्पात सोडण्याची मुभा दिली जाईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभाक्षेत्रात ६०, तर बफर क्षेत्रात १२ वाघ अाहेत.
बातम्या आणखी आहेत...