आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर पुरस्कार परत करणार; राज्यातील आदर्श शिक्षक इन्क्रीमेंटच्या प्रतीक्षेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शासकीय अनास्थेचा फटका राज्यातील गेल्या सात वर्षांतील 728 आदर्श शिक्षकांना बसला आहे. त्यांना सन्मान म्हणून देण्यात येणारे इन्क्रीमेंट न देण्यात आल्याने शिक्षकांनी आता आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. शिक्षक दिनापर्यंत (5 सप्टेंबर) शासनाने मागणीची दखल न घेतल्यास राज्यातील आदर्श शिक्षक आपला पुरस्कार परत करणार असून, या संदर्भातील निर्णयासाठी अकोल्यात 30 जून रोजी शिक्षकांची कार्यशाळा भरवण्यात येणार आहे. यात याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्य आदर्श पुरस्कारित शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष डॉ. दिलीप कळमकर यांनी दिली.

समाजाची नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे दरवर्षी 26 जानेवारीला राज्य पुरस्कारासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागस्तरावर 9६ आदर्श शिक्षकांची निवड केली जाते. 37 प्राथमिक, 38 माध्यमिक, आदिवासी क्षेत्रात काम करणारे 18 प्राथमिक शिक्षक, 2 विशेष शिक्षक कला / क्रीडा व अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील 1 शिक्षकाचा यात समावेश असतो. यासह 8 शिक्षिकांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांनी गौरवण्यात येते. त्याचे वितरण दरवर्षी शिक्षकदिनी 5 सप्टेंबरला होते.

राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाल्याच्या दिनांकापासून दोन आगाऊ वेतनवाढी देण्याची राज्य शासनाची योजना कार्यान्वित आहे. विशेष म्हणजे शासनाने 25 जानेवारी 2011 ला आदर्श शिक्षक पुरस्कारसंदर्भात शासन निर्णय काढून आगाऊ दोन वेतनवाढी सन्मान म्हणून देण्यात येतील, असे जाहीर केले होते. याशिवाय पुरस्कार मिळाल्याचे शिक्षकांना पाठवलेल्या शासनाच्या पत्रातही तसा उल्लेख असतो. असे असले तरी 1 जानेवारी 2006 पासून लागू झालेल्या सहाव्या वेतन आयोगात आदर्श शिक्षकांच्या वेतनवाढीसंदर्भात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे 1 जानेवारी 2006 ला सहावे वेतन आयोग लागू झाल्यापासून ज्या शिक्षकांना आदर्श पुरस्काराने राज्य शासनाने सन्मानित केले आहे, त्यांना अद्यापपर्यंतही आगाऊ दोन वेतनवाढी मिळाल्या नाहीत.

शिक्षकांत उदासीनता
आदर्श शिक्षकांच्या या सन्मानाची मागणी शिक्षक आमदार व शिक्षक संघटनांकडून सातत्यपूर्ण मांडली असता, दोन मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांनी वारंवार आदर्श शिक्षकांना सन्मान देऊ, असे आश्वासन दिले. मात्र, इन्क्रीमेंट लागू न झाल्याने मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरले, तर सहाव्या वेतन आयोगाने आमचा सन्मान हिरावल्याची भावना आदर्श शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री पुथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लवकरच इन्क्रीमेंट देऊ, असे आश्वासन दिले होते. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी हा प्रश्न अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. या आश्वासनावर कार्यवाही होत नसल्याने आदर्श शिक्षकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे.

इन्क्रीमेंटची पठाणी वसुली
अकोल्यातील स्व. सु. म. डामरे गुरुजी सर्वोदय विद्यालयात कार्यरत कला शिक्षक मोहन भोजापुरे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि त्यांच्या वेतनात दोन इन्क्रीमेंटही लावण्यात आल्या. मात्र, नंतर भोजापुरे यांच्या वेतनातून इन्क्रीमेंटची एकाच वेळी वसुली करण्यात आली. राज्यातील अनेक शिक्षकांवर असा प्रसंग ओढवला असून, आधी इन्क्रीमेंट लावण्यात आले, नंतर त्याची पठाणी वसुली वेतनातून करण्यात आली आहे.

आदर्श शिक्षकांचा लढा
सर्वच क्षेत्रांत लोकाभिमुख कार्य करणार्‍याचा गौरव करणे, हे शासनाचे कर्तव्यच आहे. आदर्श शिक्षकांना दोन अतिरिक्त इन्क्रीमेंट मिळाल्याच पाहिजेत. तो आदर्श शिक्षकांचा सन्मान असून, त्यांनी केलेल्या कार्याची पावती आहे. आदर्श शिक्षकांच्या हक्कासाठी लढा कायम ठेवून शिक्षकांना इन्क्रीमेंट मिळेपर्यंत शासनाला धारेवर धरू, असे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी या मुद्द्यावर बोलताना सांगितले.

या शिक्षकांचाही समावेश
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षकही इन्क्रीमेंटबाबत उपेक्षित आहेत. दरवर्षी राज्यातील 28 शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार मिळतो.त्यांनाही 7 वर्षांपासून इन्क्रीमेंट मिळाले नाही.