Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Teachers Payment Contro

आदर्श शिक्षकांना दोन महिन्यांत वेतनवाढ, वसुली थांबवण्याचेही आदेश

प्रतिनिधी | Update - Jul 16, 2013, 05:58 AM IST

सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून आदर्श शिक्षकांना सन्मान म्हणून देण्यात येणार्‍या दोन अतिरिक्त वेतनवाढी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

  • Teachers Payment Contro

    अकोला - सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून आदर्श शिक्षकांना सन्मान म्हणून देण्यात येणार्‍या दोन अतिरिक्त वेतनवाढी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे गेल्या सात वर्षात राज्यातील 72८ आदर्श शिक्षक या सवलतीपासून वंचित राहिले होते. यातच भर म्हणून ज्या शिक्षकांना वेतनवाढ दिली, त्यांच्याकडून पठाणी वसुली करण्यात आली.

    शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागस्तरावर 9६ आदर्श शिक्षकांची निवड पुरस्कारासाठी करण्यात येते. या पुरस्काराचे वितरण शिक्षक दिनी 5 सप्टेंबरला होते. राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाल्याच्या दिनांकापासून दोन आगाऊ वेतनवाढी देण्याची राज्य शासनाची योजना कार्यान्वित आहे. विशेष म्हणजे शासनाने 25 जानेवारी 2011 ला आदर्श शिक्षक पुरस्कारासंदर्भात शासन निर्णय काढून आगाऊ दोन वेतनवाढी सन्मान म्हणून देण्यात येतील, असे जाहीर केले. याशिवाय पुरस्कारप्राप्त शिक्षकांना पाठवलेल्या पत्रातही तसा उल्लेख असतो. असे असले तरी 1 जानेवारी 2006 पासून लागू झालेल्या सहाव्या वेतन आयोगामध्ये आदर्श शिक्षकांच्या वेतनवाढीसंदर्भात कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे 1 जानेवारी 2006 ला सहावे वेतन आयोग लागू झाल्यापासून ज्या शिक्षकांना आदर्श पुरस्काराने राज्य शासनाने सन्मानित केले आहे, त्यांना अद्यापपर्यंतही आगाऊ दोन वेतनवाढी मिळालेल्या नाहीत. ज्या आदर्श शिक्षकांना वेतनवाढ लागू झाली त्यांच्याकडून शिक्षण विभागाने एकरकमी वसुली केली. पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी या गंभीर प्रश्नावर चर्चा झाली. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी लवकरच वेतनवाढ लागू करू, असे आश्वासन पुन्हा दिले. आमदार डॉ. रणजित पाटील यांनी उपप्रश्न उपस्थित करून ठोस निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यावर अजित पवार यांनी दोन महिन्यात लाभ देण्याची घोषणा केली.

    ‘दिव्य मराठी’चे वृत्त गाजले
    या गंभीर प्रकरणाचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने 9 जूनच्या अंकात प्रकाशित केले. त्याचे परिणाम सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उमटले. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आदर्श शिक्षकांकडून केली जाणारी पठाणी वसुली थांबवून त्यांना दोन महिन्यांत अतिरिक्त वेतनवाढ लागू करू, अशी घोषणा केली.

Trending