आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेकींच्या जगण्यासाठी झटतेय शिक्षकांची संघटना, एका मुलीवर कुटुंब नियोजनासाठी कार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पदोन्नती, वेतनवाढ, वेतनश्रेणी, समायोजन, शाळाबाह्य कामे अशा मुद्द्यांवर आंदोलन करणाऱ्या शिक्षक संघटना आहेत. पण गोंदिया जिल्ह्यातील सहयाेग शिक्षक मंच ही संघटना मात्र बांधिलकी जपत समाजाला नकाेशा असलेल्या लेकींच्या जगण्यासाठी झटत आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखणे, एका मुलीवर कुटुंब नियोजनासाठी जनजागृती व मूलबाळ नसलेल्यांना मुलगी दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम ही संघटना करत आहे. बीड जिल्ह्यातील भ्रूणहत्येच्या घटनांतून या शिक्षकांनी प्रेरणा घेतली आहे.

गोंदियाच्या गोरेगाव या आदिवासी तालुक्यात खेडोपाडी नोकरी करतानाच समाजसेवेचा ध्यास घेतलेले १५ शिक्षक एकत्र आले. आॅगस्ट २०१४ मध्ये त्यांनी संघटना स्थापन केली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे राम सोनारे यांचे मार्गदर्शन होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातील ६० हून अधिक शिक्षक संघटनेशी जोडले आहेत. आपापल्या नोकरीच्या गावीच हे लोक विद्यार्थी घडवण्यासोबत समाजसेवाही करतात.

कागदपत्रांसाठी लोकांना मदत
संघटनेच्या मार्गदर्शनातून एखाद्या दांपत्याने मुलगी दत्तक घेतली किंवा एका मुलीवर कुटुंबनियोजनाचा निर्णय घेतला तर संघटनेचे सदस्य त्यांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी मदत करतात. गोरेगाव तालुक्यात ९ केंद्रांवरील शिक्षक ही जबाबदारी घेतात. प्रशासकीय कामांसाठी जबाबदार शिक्षक मदत करतो. एका मुलीवरच कुटुंब नियोजन करण्यासाठी संघटनेने आजवर ३० दांपत्यांना प्रेरित केले. संघटनेच्या संस्थापक सदस्यांत अशोक चेपटे, युवराज बडे, युवराज माने हे शिक्षक बीड जिल्ह्याचे आहेत. गोंदियातच ते नोकरीस आहेत. बीडमध्ये स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण मोठे आहे. ६ ते १४ वयोगटांतील मुला-मुलींचे गुणोत्तर दर हजारी ८०१ आहे. त्यामुळेच स्त्री भ्रूणहत्या, मुलींच्या विकासासाठी काम करण्याचे या शिक्षकांनी ठरवले व त्यानुसार त्यांचे कार्य सुरू अाहे.

राज्यभर उपक्रम राबवू
शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार गेल्या २ मे रोजी गोंदियात होते. संघटनेने त्यांच्यासमोर या कामांचे सादरीकरण केले. या उपक्रमाची स्तुती करून संपूर्ण राज्यात हे उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नंद कुमार यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...