आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका निरीक्षकाकडे दहा दुकाने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - स्थानिक संस्था कराची वसुली वाढवण्यासाठी महानगरातील प्रत्येक प्रतिष्ठानाची तपासणी केली जाणार आहे. एका निरीक्षकाला एका दिवशी दहा दुकानांची तपासणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तपासणीदरम्यान विनादेयकांचे साहित्य आढळल्यास संबंधित व्यापार्‍यांना दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मागील काही महिन्यांपासून एलबीटीचे उत्पन्न कमालीचे घटले आहे. कर्मचार्‍यांसह महापालिकेच्या विकासावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम होत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एलबीटी पथकाकडून शहरात चोरट्या मार्गाने येणारे साहित्य ताब्यात घेण्याची कारवाई केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात कापड तसेच 80 लाख रुपयांचे मोबाइल जप्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्यात आल्यानंतरदेखील चोरट्या मार्गाने शहरात साहित्य आणले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रत्येक दुकानामध्ये जात तपासणी करण्याची मोहीम महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. एका दिवसामध्ये एका निरीक्षकाला दहा दुकानांची तपासणी करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. तपासणीदरम्यान विनादेयक साहित्य तसेच काही तफावत आढळल्यास संबंधित प्रतिष्ठानांचे मूल्यांकन केले जाणार आहे. एलबीटीचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून आरंभ करण्यात आलेल्या मोहिमेमुळे अनेक व्यापार्‍यांचे पितळ उघडे पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. ही कारवाई थांबवण्यासाठी व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्त अरुण डोंगरे यांचीदेखील भेट घेतली. मात्र, त्यानंतरदेखील कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्थानिक संस्था कर अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले.
एकाच दिवशी नोटीस
तपासणी मोहिमेदरम्यान तफावत आढळलेल्या व्यापार्‍यांचे संपूर्ण वर्षाचे मूल्यांकन केले जाणार आहे. एलबीटी भरणा व साहित्य आणल्याच्या दस्तएवेज वेगळे आढळून आल्यास व्यापार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. मूल्यांकन प्रक्रिया झाल्यानंतर एकाच दिवशी सर्व व्यापार्‍यांना नोटीस देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.