आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराफांना फसवणारी टोळी अखेर गजाआड, राजस्थानमधील तीन महिलांचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा/अंजनगावसुर्जी - नकली सोने खरे भासवून तीन प्रमुख सराफा व्यापार्‍यांसह सामान्य नागरिकांना लाखो रुपयांनी गंडवणार्‍या राजस्थानमधील टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन महिलांसह एका पुरुषाचा समावेश असलेल्या या टोळीने परतवाडा, अंजनगावसुर्जी आणि मूर्तिजापूर येथील सराफा व्यापार्‍यांसह अनेकांची लाखो रुपयांनी फसगत केल्याचे उघडकीस आले आहे. आणखी किती जणांना या टोळीने चुना लावला, याचा पोलिस शोध घेत आहेत.
पप्पू नायक भाटी, विमला नायक भाटी, सुमितीदेवी भाटी, प्रभादेवी भाटी असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून, ते मूळचे राजस्थानमधील रहिवासी आहेत. ही टोळी नकली सोने गहाण ठेवून त्या बदल्यात व्यापार्‍यांकडून रोख रक्कम घेत असे. अंजनगावसुर्जी येथील तारेकर ज्वेलर्सचे संचालक मंगेश मधुकरराव तारेकर यांच्याबाबत असाच प्रकार घडला. या चार ठगांनी 17 मे 2014 रोजी 450 ग्रॅम नकली सोने गहाण ठेवून 10 लाख रुपये घेऊन निघून गेले. अशाच पद्धतीने परतवाडा येथील प्रमोद माळेकर यांच्याकडून अडीच लाख रुपयांची उचल केली.
काही दिवसानंतर अंजनगाव सुर्जी येथील तारेकर यांनी राजस्थानच्या टोळीने गहाण ठेवलेले सोन्याच्या लॉकेट श्रीराम फायनान्सकडे गहाण ठेवले. अशाच प्रकारचे दागिने परतवाडा येथील माळेकर व मूर्तिजापूर येथील सराफा व्यापार्‍यांनी श्रीराम फायनान्सकडे गहाण ठेवल्याने तेथील अधिकार्‍यांना दागिन्यांबद्दल संशय आला. त्यांनी बारकाईने पाहणी केली असता, तिन्ही व्यापार्‍यांनी गहाण ठेवलेले दागिने नकली असल्याचे लक्षात आले. श्रीराम फायनान्सच्या अधिकार्‍यांनी याची माहिती तारेकर, मोळेकर व मूर्तिजापूर येथील व्यापार्‍यांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र, हा व्यवहार कागदोपत्री न झाल्याने व्यापार्‍यांनी याची तक्रार पोलिसांत केली नव्हती. पुन्हा ही टोळी तारेकर यांच्याकडे दागिने गहाण ठेवण्यासाठी आणले असता, त्यांना ताब्यात घेऊन परतवाडा येथील मोळेकर यांच्याकडे आणले. मोळेकर यांनी या टोळीला ओळखल्यानंतर मोळेकर यांनी परतवाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता, फसवणुकीची घटना अंजनगावसुर्जी येथील असल्याने ठाणेदार बोबडे यांनी अंजनगावसुर्जी पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अंजनगावसुर्जी पोलिसांनी या टोळीला गजाआड केले. या टोळीने आतापर्यत किती लोकांना फसवले, याचा पोलिस शोध घेत आहेत.
यामुळे झाली फसगत
या टोळीने ज्या सराफा व्यापार्‍यांकडे सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्यावर त्यांनी सोन्याचा जाड मुलामा चढवला होता. त्यावर सोनारांनी नेहमीच्या पद्धतीने दागिने पारखण्यासाठी आम्ल टाकल्यावरही हे दागिने नकली असल्याचे उघड झाले नाही. कारण सोन्याचा जाड मुलामा चढवल्याने सराफा व्यापार्‍यांची मोठय़ा प्रमाणात फसगत झाली.

छायाचित्र - टोळीचा मुख्य सूत्रधार पप्पू नायक भाटी