आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीचे आमिष दाखवणारा ठकसेन गजाआड; राज्यभरात अनेक तरूणांना गंडा घातल्याचा संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शासकीय नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांकडून कोट्यवधीची माया जमवणारा ठकसेन मारोतराव गणपत गोरलेवार (45) याला पोलिसांनी मंगळवारी नागपूरात अटक केली.
तालुक्यातील मल्हारा येथील श्रीपतराव इंगळे व परतवाडा येथील रविनगरातील रहिवासी अविनाश गवई या दोन बेरोजगारांनी सहा महिन्यांपूर्वी तेथीलच विदर्भ मिल येथील विजय वानखडे याच्याविरुद्ध अचलपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. मुंबई येथील एफडीआय विभागात नोकरी लावून देतो, असे आश्वासन देत वानखडे याने दोघांकडून प्रत्येकी सहा लाख रुपये घेतले होते. बनावट वेबसाइटवरून त्यांना नियुक्तीपत्रही दिले होते. या प्रकरणी विजय वानखडे व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. नगराध्यक्ष अरुण वानखडे यांचेही त्यात नाव गोवले गेले. या प्रकरणाच्या सखोल तपासणीसाठी अचलपूर पोलिस मुंबईलाही गेले होते.

तपासादरम्यान गोरलेवार हा मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्याला अचलपूर पोलिसांनी नागपूर येथून अटक केली. न्यायालयातून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. गोरलेवारच्या अटकेमुळे बेरोजगारांची फसवणूक करणारे राज्यस्तरीय रॅकेट समोर येण्याचे संकेत मिळाले आहेत.
कोट्यवधीची माया
बेरोजगार युवकांना फसवणार्‍या गोरलेवारचे जाळे राज्यभर पसरले आहे. शासकीय नोकरीचे आमिष दाखवून त्याने कोट्यवधीची मायाही जमवल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. आपले बिंग फुटू नये म्हणून तो सतत वास्तव्याचे ठिकाण बदलवत होता. या प्रकरणात मानेकर नामक इतर एका व्यक्तीचे नाव पुढे आले. मात्र, त्याला अद्याप अटक होऊ शकली नाही.