आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्याची धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या घरात प्रवेश करून युवकाने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी घडलेल्या या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या युवकाचे मानसिक संतुलन ढासळले असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. मात्र, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार ठाकूर यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

सिद्धार्थ किशोर देशमुख (21 रा. आशियाड कॉलनी) हा आमदार ठाकूर यांच्या गणेडीवाल ले-आउट येथील घरी सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास गेला. या वेळी काही नागरिकांसमवेत आमदार ठाकूर चर्चा करीत होत्या. त्यांचे वडील भय्यासाहेब ठाकूरदेखील या प्रसंगी हजर होते. सिद्धार्थने भय्यासाहेब व यशोमती ठाकूर या दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली; तसेच त्यांच्या अंगावर धावून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. शिवाय विविध राजकीय नेत्यांचा उल्लेख करून आपण त्यांचे कार्यकर्ते असल्याचेही तो म्हणाला. ही माहिती तातडीने गुन्हे शाखा आणि गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आमदार ठाकूर यांचे घर गाठून सिद्धार्थला ताब्यात घेतले.

दरम्यान, सिद्धार्थचे मानसिक संतुलन ढासळल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, त्याच्या अशा वागणुकीमुळे मला व माझ्या कुटुंबाला धोका होऊ शकतो. यामागे चिथावणी देण्याचा प्रकारही असू शकतो, अशी शक्यता आमदार ठाकूर यांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत वर्तवली आहे.

मी सत्य व क्रांतिकारी विचारांचा आहे. देशातील भ्रष्टाचार संपलाच पाहिजे. त्यासंदर्भात आमदारांची भेट घेतली. त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना बोलावून मला अडवले व पोलिसांच्या ताब्यात दिले, असे सिद्धार्थने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.


चिथावणीची शक्यता असू शकते
घरात येऊन धमकी देण्याचा प्रकार गंभीर आहे. त्याचे मानसिक संतुलन ढासळले असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे त्याच्यावर उपचार व्हावेत. पण, सुरक्षेच्या दृष्टीने मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दिली. तो मानसिक आजारी असला तरी त्याला या कामासाठी कोणीतरी चिथावणी देत असावे, अशी शक्यता नाकारता येत नाही. पोलिस तपासात हे निष्पन्न होईलच. यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा


आमदारांना पोलिस सुरक्षा
या घटनेनंतर सुरक्षा देण्याची मागणी आमदार ठाकूर यांनी केली होती. त्यामुळे आमदार व त्यांच्या मुलांना पोलिस सुरक्षा देण्यात आली. याप्रकरणी सिद्धार्थ देशमुख यांच्यावर घरात अनधिकृत प्रवेश करणे, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थच्या मानसिक स्वास्थ्य तपासणीचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडून मागवण्यात आला आहे. संजय लाटकर, पोलिस उपायुक्त