आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टायगर कॉरिडॉर’च्या शोधात एका वाघाचा प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - अलाहाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 71 वर सतना जिल्ह्यात मैहर येथून 20 किलोमीटर दूर कंचनपूर हे छोटेसे गाव. या गावासह पंचक्रोशीतील डझनभर गावांतील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य. वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर उचेहरा रेल्वेस्थानकावर एक ट्रेनदेखील थांबवण्यात आली आहे. कारण होते तेथून एका राजाची स्वारी मार्गस्थ होणार होती. हा राजा दुसरा तिसरा कुणी नसून तो एक चार वर्षांचा नर वाघ टायगर पी - 212 हा होता. हा वाघ जंगलाच्या दिशेने चालू लागला. त्याच्या मागे ठरावीक अंतर ठेवून चार हत्तींवर तैनात असलेले एक पथक वेगाने निघाले व कॅमोर पर्वतरांगांमधील घनदाट जंगलात चालू लागले.

पन्ना अभयारण्यातून हा चारवर्षीय वाघ त्याच्या जुन्या साम्राज्याचा धांडोळा घेण्यासाठी निघाला आहे. त्याच्या गळ्यात एक रेडिओ कॉलर बसवण्यात आला आहे. ऑक्टोबर 2010 मध्ये जन्मलेला पी-212 या वाघाच्या नावे वेगळा इतिहास रचला जाणार आहे. देशभरातील वन व प्राणी अभ्यासक त्याच्या प्रवासावर लक्ष ठेवून आहेत. कारण हा वाघ 70 - 80 वर्षांपूर्वी त्याचे पूर्वज ज्या जंगलात (टायगर कॉरिडॉर) मुक्तपणे फिरत होते, त्या मार्गाने त्याचा प्रवास सुरू राहणार आहे. आता या टायगर कॉरिडॉरचे अस्तित्व कागदावरच शिल्लक राहिले आहे. वनविभागातील जुन्या अधिकार्‍यांच्या स्मृतींमध्येही तो मार्ग आहे, परंतु आता या मार्गावरील जंगल विरळ झाले आहे, अनेक ठिकाणी बांधकामे झाली आहेत. आता हा वाघ पन्ना अभयारण्यातून ज्या मार्गांनी जाईल त्याचा नकाशा तयार केला जाईल. त्यानंतर जर सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर हा ‘टायगर कॉरिडॉर’ पुन्हा जिवंत होऊ शकेल.

ही मोहीम कशासाठी?
विंध्याचल व कॅमोर पर्वतरांगांमध्ये लुप्त झालेला टायगर कॉरिडॉरचा शोध घेण्यासाठी एक वाघ (पी-212) रवाना करण्यात आला आहे. त्याच्या सर्व हालचालींचा अभ्यास पर्यावरण तज्ज्ञ करणार आहेत. महिनाभर चालणार्‍या या मोहिमेत वाघाच्या मागे दोन हत्तींसह 30-40 लोक सहभागी आहेत. गळ्यातील रेडिओ कॉलर व जीपीएसद्वारे वाघाच्या हालचालींवर बारकाईंने लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती प्रमुख रेंज ऑफिसर तृष्टी सिंह यांनी दिली. सध्या हा वाघ सतना जिल्ह्यात गोरसरीच्या जंगलात गुहांजवळ आहे. पन्ना अभयारण्याचे संचालक आर. र्शीनिवासन यांच्या म्हणण्यानुसार तेथून हा वाघ बांधवगड, संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य किंवा चित्रकूटकडे जाऊ शकतो.