आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजनगावसुर्जी जंगलात आढळला मृत वाघ, प्रेत कुजलेल्या अवस्थेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पूर्व मेळघाट वनपरिक्षेत्रात असलेल्या अंजनगावसुर्जीच्या जंगलात बुधवारी एक मृत वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. ही माहिती मिळताच मुख्य वनसंरक्षकासह वनविभागाची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. या घटनेने वनविभागात खळबळ उडाली आहे.

वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचा मृत्यू नैसर्गिक असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार आहे. वाघांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी वनविभाग आणि शासनाकडून अनेक उपायोजना करण्यात आल्या आहेत. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. वनविभागाने नुकतीच वाघाची शिकार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद केली. त्या टोळीने मेळघाटसह मध्यप्रदेशात सहा वाघांची शिकार केल्याची कबुली दिली होती. वाघांच्या शिकारीच्या दोन घटना मार्च आणि मे महिन्यात मेळघाटात उघडकीस आल्या होत्या. या शिकारीसुद्धा त्याच टोळीने केल्याचे उघड झाले आहे. आज मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचा मृत्यू हा शिकारीचा प्रकार असू शकतो का, या दृष्टीने तपास केला जाणार आहे.