आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या शिकारीचा सीबीआय करणार तपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पात यावर्षी दोन वाघांची शिकार झाल्यानंतर स्थानिक आरोपी वनविभागाच्या शिकंज्यात आले; मात्र वाघाचे कातडे आंतरराष्ट्रीय बाजारात विकणारा पंजाबातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाट आहे. वनविभागाने त्याचा छडा लावण्यासाठी सीबीआयची मदत घेण्याचा निर्णय घेतला असून, राज्य शासनाने सीबीआयला तसे पत्र पाठवले आहे.


मेळघाटात यावर्षी मार्च आणि मे महिन्यात दोन वाघांची शिकार झाली. दोन्ही घटनांमध्ये शिकार करणारे स्थानिक आरोपी वेगवेगळे असले तरी त्यांच्याकडून कातडे घेणारा एकच आहे. रंजितसिंग बावरिया याचे नाव याप्रकरणात पुढे असून, तो पंजाबमधील होशियारपूर येथील रहिवासी आहे. त्याने आतापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या शिकार्‍यांकरवी वाघांची शिकार केल्याचे समजते. वाघांचे कातडे कमी दरात खरेदी करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकण्याचा त्याचा धंदा असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली आहे. मार्च महिन्यात झालेल्या शिकारीनंतर वनविभागाने स्थानिक आरोपींना अटक केली आणि रंजितसिंग बावरियाला मुख्य आरोपी केले. त्याच्यासह भारा आणि भजन हे दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. काही दिवसांपूर्वी वनविभागाचे पथक होशियारपूरला गेले होते. मात्र, रंजितसिंग त्यांना गवसला नाही.


शिकारीबाबत राज्य सरकार गंभीर असून, रंजितसिंगच्या अटकेसाठी तातडीने मदतीसाठी सीबीआयसोबत पत्रव्यवहार केला आहे. म्हणून आता पुढील तपास सीबीआय करणार आहे.


रंजितसिंग सीबीआयलाही ‘वॉन्टेड’ : रंजितसिंग वाघांची शिकार व कातडीच्या तस्करीसाठी ओळखला जातो. त्यामुळेच 2009मध्ये नागपुरात सीबीआयने त्याला पकडले होते. त्यानंतर जामिनावर बाहेर आलेला रंजितसिंग अद्याप ताब्यात आला नाही. तो सध्या सीबीआयलाही ‘वॉन्टेड’ आहे.


रंजितसिंगला लवकरच पकडू
मुख्य आरोपी रंजितसिंगला अटक करण्यासाठी एकदा आमची चमू गेली होती. आता त्याला पकडण्यासाठी सीबीआय मदत करणार आहे. लवकरच त्याला आम्ही अटक करू. त्याला अटक केल्यानंतर मेळघाटच नव्हे, तर संपूर्ण देशातील वाघांच्या शिकारीची अधिक माहिती पुढे येईल. के. पी. सिंग, मुख्य वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प