आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती - देश पातळीवरील संघटन, विस्तार आणि योजना अशा तीन प्रमुख मुद्द्यांवर विचारमंथन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आठ दिवसीय बैठक 9 जुलैपासून अमरावतीत सुरू होत आहे. या बैठकीसाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी अमरावती मुक्कामी दाखल झाले आहेत, तर भाजप अध्यक्ष राजनाथसिंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
संघाच्या प्रांत प्रचारकांची दरवर्षी बैठक होते. या वेळी ही बैठक 9 जुलै ते 15 जुलैदरम्यान, अमरावतीत व्यंकटेश लॉन परिसरात होत आहे. देशभरातील 180 प्रांत प्रचारक आणि संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहतील. देश पातळीवरील संघटन, विस्तार आणि योजना अशा तीन प्रमुख मुद्द्यांसह आगामी लोकसभा निवडणुकीत संघाची भूमिका यावरही बैठकीत प्रामुख्याने चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.
सोमवारी दिवसभर संघाच्या पदाधिका-यांचे आगमन सत्र सुरू होते. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि भय्याजी जोशी हे दोघेही 15 जुलैपर्यंत अमरावतीत मुक्कामी आहेत. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल आणि प्रवीण तोगडिया हेही 8 जुलैपासून तीन दिवस शहरात आले आहेत. 9 जुलैला बौद्धिक वर्ग होणार आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंग 10 जुलैला शहरात दाखल होत आहेत. ते दुपारी 12 वाजता अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर दाखल होतील. तेथून ते सरळ बैठकस्थळी जातील.
या मुद्द्यांवरही चर्चा
भाजपच्या अध्यक्षपदी राजनाथसिंग यांची झालेली नियुक्ती, नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या प्रचारप्रमुखपदी झालेली निवड, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाराजी नाट्य, भाजपची देश पातळीवर झालेली घसरण, या मुद्द्यांवरही प्रामुख्याने बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.