नागपूर - मुख्यमंत्री निवडीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या नेत्यांमधील रस्सीखेच गेल्या महिन्यात नागपुरात चांगलीच रंगली. या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नेते रविवारी सायंकाळी नागपुरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत प्रथमच एका मंचावर दिसणार आहेत.
संघाचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने हे तिन्ही नेते एका मंचावर येणार आहेत. रविवारी सायंकाळी ७ वाजता स्व. वसंतराव देशपांडे स्मृती सहभागृहात हा सोहळा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून असतील. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री निवडीवरून फडणवीस आणि गडकरी गटातील शीतयुद्धाला जाहीर वाचा फुटली होती. गडकरी यांनाच मुख्यमंत्री बनवण्याची जाहीर भूमिका विदर्भातील बहुतांशी आमदारांनी घेतली. त्याचे राजकीय पडसाद भाजपमध्ये उमटल्याने अखेरच्या क्षणी गडकरी गटाला तलवार म्यान करावी लागली. मुख्यमंत्रिपदावर फडणवीस यांच्या नियुक्तीने नागपुरात दोन सत्ता केंद्र तयार झाले आहेत. या दोन्ही सत्ता केंद्रांवर नियंत्रण ठेवणा-या संघाने या वादावर अद्याप कुठलीही जाहीर भूमिका मांडलेली नाही. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत प्रथमच हे दोन्ही नेते एका मंचावर येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात परिवारातील नेत्यांच्या नजरा या नागरी सत्काराच्या समारंभाकडे लागलेल्या आहेत.