आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toll Booths Broken, Violated Agatiation In Washimas District

राज्यभरात टोलनाक्यांची तोडफोड सुरूच,वाशीम जिल्ह्यात हिंसक आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभर सुरू केलेले टोलविरोधी आंदोलन तिस-या दिवशी मंगळवारीही सुरू होते. विदर्भातील वाशीम जिल्हा व मुंबईतील वरळी सी लिंकवरील टोलनाक्यावर हल्लाबोल करत कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास वाशीम ते अमरावती महामार्गावरील ढंगारखेड (ता. कारंजालाड) आणि मोहरी (ता. मंगरुळपीर) हे दोन नाके फोडण्यात आले, त्यात एक कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी याप्रकरणी जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे यांच्यासह आठ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
राज ठाकरे यांनी रविवारी एका कार्यक्रमात ‘टोल नाक्यावर कुणीही आडवे आले तरीही टोल भरू नका’ असे आदेश दिले होते. त्यानंतर वाशीम जिल्ह्यातील मालेगाव, कारंजालाड आणि मंगरुळपीर तालुक्यातील टोलनाक्यावर सोमवारी सकाळपासूनच कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
दरम्यान, मालेगाव-मेहकर रस्त्यावरील टोलनाक्यावर मालेगाव तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी जावून केवळ टोल विरोधी घोषणा देऊन आंदोलन केले. त्या ठिकाणी कुठलीही तोडफोड केली नाही. त्यानंतर सायंकाळनंतर पोलिस बंदोबस्त शिथिल झाला. याचाच फायदा घेत कार्यकर्त्यांनी कारंजालाड आणि मंगरुळपीर तालुक्यातील टोलनाक्यावर जावून सोमवारी मध्यरात्री तोडफोड केली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी विविध ठिकाणी पथक पाठवून मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील राजे, निवासी उपजिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, कारंजालाड येथील दिनेश वारेकर, अलोक ठाकरे, यांच्यासह आठ जणांना अटक केली.
शर्मिला ठाकरे यांचे आवाहन,
चुकले असेल तर राज, मलाही अटक करा !
राज्यातील टोल नाक्यांविरोधात मनसेने छेडलेले आंदोलन योग्यच आहे. राज ठाकरे या आंदोलनाला पूर्णत्वास नेतील, असा विश्वास आहे. टोल भरून नागरिकांचे नुकसान होत असून मंत्र्यांचे मात्र खिसे भरत आहेत. आमचा विरोध टोलला नसून कार्यपद्धतीला आहे. या आंदोलनात आमचे चुकले असेल तर राजसह मलाही पोलिसांनी अटक करावी, असे मत राज यांच्या पत्नी व मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. टोलनाके फोडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनसे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी त्यांनी मंगळवारी पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्याला भेट दिली.
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाल्या की, आम्ही कोणत्याही कारवाईस घाबरत नाही. रस्ते चांगले द्यावेत व वाढीव टोल बंद करावेत, हीच आमची मागणी आहे. कायदेशीररित्या योग्य टोल व्यवस्था असावी, त्याची जबाबदारी खासगी कंपनीकडे नसावी या मागणीसाठीच आमचे आंदोलन आहे. यापूर्वीही आम्ही रस्त्यावर आंदोलन केले, विधिमंडळात दाद मागितली मात्र अपेक्षित कारवाई न दिसल्याने पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. आंदोलनावर टीका करणे सोपे असते. आंदोलन केले तरी टीका होते व नाही केले तरी टीका होते. आंदोलन कसे असावे हे प्रसारमाध्यमांनीच सांगावे म्हणजे पुढील वेळेस तशाप्रकारे आंदोलनाची दिशा ठरवता येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोल्हापूरमध्ये उद्भवला तिढा
टोल आंदोलनात पोलिसांची कोंडी !
गेली चार वर्षे पेटलेले टोलविरोधी आंदोलन हिंसक होऊ नये यासाठी एकीकडे दक्षता घ्यायची आणि दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टोलनाक्यांना संरक्षण द्यायचे, अशा दुहेरी कोंडीत कोल्हापूर पोलिस सापडले आहेत. ‘आयआरबी’ने पुन्हा टोलवसुली करण्यासाठीची प्रक्रिया कागदोपत्री सुरू केली असली तरी प्रत्यक्षात मंगळवारी सायंकाळपर्यंत टोल वसुली सुरू करण्यात आली नव्हती. दरम्यान, सोमवारी रात्री काही नगरसेवकांनी दोन टोलनाक्यांवरील कर्मचा-यांना मारहाण केल्याने त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांची जामिनावर मुक्तताही करण्यात आली.
तीन महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने ‘आयआरबी’ कंपनीला टोलवसुलीसाठी पोलिस संरक्षण द्यावे असे आदेश दिले होते. दरम्यान करारावेळी निशुल्क पोलिस बंदोबस्त द्यावा असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे नेहमीच्या गुन्ह्यांच्या तपासाला पोलिस नाहीत आणि दुसरीकडे आयआरबीच्या टोलनाक्यांच्या संरक्षणासाठी शेकडोंचा फौजफाटा असे चित्र सध्या कोल्हापुरात आहे.
एवढे होवूनही ‘आयआरबी’ने पुन्हा टोलवसुलीसाठीची तयारी सुरू केल्याने सोमवारी रात्री महापालिकेच्या प्रमुख नगरसेवकांनी उचगाव आणि शिरोली टोलनाक्यावरील कर्मचा-यांना मारहाण करून त्यांना हुसकून लावले होते. या प्रकरणी आठ नगरसेवकांना मंगळवारी अटक करण्यात आली. त्यांची लगेचच जामीनावर मुक्तता झाली.