आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील माअाेवादी हिंसाचारात घट;सरसंघचालकांशी बंदद्वार चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर-देशभरात माओवादी चळवळीवर अंकुश लावण्यात आम्हाला यश मिळत आहे. मागील पंधरा वर्षांतील हिंसाचार लक्षात घेता रालोआच्या वर्षभराच्या कारकीर्दीत या हिंसाचारात २० ते २५ टक्क्यांनी घट झाली अाहे, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गुरुवारी केला.
केंद्रीय गृहमंत्री म्हणून पहिल्याच नागपूर दौऱ्यात अालेल्या राजनाथसिंह यांनी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील परिस्थितीचा तसेच नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला. केंद्र आणि राज्यांमध्ये चांगला समन्वय असल्याचे सांगताना महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर त्यांनी समाधानही व्यक्त केले. या लढ्यात महाराष्ट्राला आवश्यक संसाधने पुरविण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोली-गोंदियातील विकासाच्या केंद्राकडे प्रलंबित प्रस्तावांची माहिती घेतली असून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे राजनाथसिंह यांनी नमूद केले. केंद्र सरकारची कामगिरी एक्स्लंट आहे. जगाच्या पाठीवर भारताची प्रतिष्ठा वाढली. त्याला आंतरराष्ट्रीय संस्थांकडून दुजोरा मिळत आहे. हीच मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई सुरू असल्याच्या आरोपाचा त्यांनी इन्कार केला. केंद्रातले सरकार सुटाबुटातले असल्याचे राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे असून त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

राजनाथसिंह यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत इतर पदाधिकाऱ्यांशी दोन तास बंदद्वार चर्चाही केली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी मोदी सरकारची वर्षभराची कामगिरी, नेपाळमधील भूकंपाची आपत्ती तसेच अलीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरील कॅगचा ठपका, अशा अनेक विषयांवर खल झाल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या वाड्यालाही राजनाथ यांनी भेट दिली.

विदर्भाच्या निर्मितीवर मौन
विदर्भराज्याच्या निर्मितीवर राजनाथसिंह यांनी आज मौन बाळगले. वाजपेयी सरकारने तीन नवी राज्ये निर्माण केली. तुम्ही विदर्भाचे श्रेय घेणार काय? या प्रश्नावर ‘विदर्भ के लोक अच्छे है’, असे सांगत आप लोक तोडफोड मे विश्वास नही रखते है, असे विधानही त्यांनी केले.

भागवत माझ्यावर नेहमीच खुश
मोदीसरकारच्या कामगिरीवर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत खुश आहेत काय? या प्रश्नावर बोलताना राजनाथसिंह यांनी ते माझ्यावर नेहमीच खुश असतात, असे सांगितले. मी द्वितीय वर्ष झालेला स्वयंसेवक आहे. त्यामुळे तृतीय वर्षाला कसा शिकवणार? असे नमूद करून संघाच्या वर्गात मार्गदर्शन केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...