आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेट मतदार यादी ‘मोबाइल अ‍ॅप्स’वर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आधुनिकतेकडे पाऊल टाकत सिनेट निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण मतदार यादीच आता ‘मोबाइल अ‍ॅप्स’वर उपलब्ध करून दिली आहे. पदवीधर नोंदणी ऑनलाइन प्रणालीने करण्यासोबत यापूर्वीच्या मतदारांना त्यांचे नाव अ‍ॅप्सच्या मदतीने मोबाइलवरच पाहता येणार आहे. विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिलेल्या यंत्रणेमुळे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांना मोठी सुविधा होणार आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संकेत स्थळावर ‘सिनेट इलेक्शन’ नावाने पदवीधर नोंदणीसाठी स्वंतत्र लिंक तयार केली आहे. पदवीधर नोंदणीसाठी येथे ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिला आहे. शिवाय याच पोर्टलवर सिनेट मतदार यादीचे पाच खंडदेखील उपलब्ध करून दिले आहे. संकेतस्थळासह भ्रमणध्वनीवर यादीतील नाव पाहता यावे म्हणून मोबाइल अ‍ॅप्स उपलब्ध करून दिले आहे. याच पोर्टलवरून हे अ‍ॅप्स मोबाइलमध्ये डाउ‌नलोड करता येणे शक्य आहे. पदवीधर नोंदणीसाठी विद्यापीठाच्या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया एप्रिल १५ पासून सुरू केली असून, मे १५ पर्यंत पदवीधरांना मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच सिनेट निवडणुकीत ऑनलाइन प्रणालीचा अवलंब केला आहे. याबाबत एप्रिलला विद्यापीठ प्रशासनाकडून अधिसूचना काढली. सिनेटची निवडणूक जुलै-ऑगस्टमध्ये होऊ घातली आहे. प्राध्यापक, प्राचार्य, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, पदवीधर, महिला, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून सिनेटवर प्रतिनिधी म्हणून जाता येते. ही निवडणूक लढवण्यासाठी पदवीधर मतदारसंघाच्या यादीत नावनोंदणी असणे आवश्यक आहे. पदवीधर झालेल्या व्यक्तीला नाव नोंदवता यावे म्हणून सिनेट निवडणुकीपूर्वी विद्यापीठातून हा कार्यक्रम घोषित केला आहे.

असा भरा ऑनलाइन अर्ज
सिनेट निवडणूक नावाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला अर्ज ऑनलाइन भरावा. भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्यासोबत पदवीची झेराक्स प्रत, निवासाचा दाखला (राशन कार्ड अन्य) लावणे गरजेचे आहे. भरलेल्या अर्जाची प्रिंट कागदपत्रांसह अर्ज विद्यापीठाच्या आवक शाखेत आणून द्यावा. यासोबत २५ रुपयांचे शुल्क अदा करावे लागणार आहे. छाननीनंतर मतदार यादीत नाव समाविष्ट होणार आहे. याबाबत भ्रमणध्वनीवर संदेश प्राप्त होणार आहे.

प्ले-स्टोअरवरही
संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीसाठी तयार केलेले ‘मोबाइल अ‍ॅप्स’चे अद्याप लोकार्पण केले नाही. मोबाइल अ‍ॅप्सचे उद्घाटन झाल्यानंतर प्ले-स्टोअरवरदेखील उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आहे. सिनेट निवडणुकीला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने लवकरच हे मोबाइल अ‍ॅप्स उपलब्ध होणार असल्याचे संकेत आहे.

अ‍ॅप्सचे कार्यान्वयन
१.विद्यापीठाचे संकेतस्थळ
२. सिनेट निवडणूक लिंक
३. मोबाइल अ‍ॅप्स
४. विद्याशाखेचे नाव
५. पदवीधराचे नाव