आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unseasonal Rain News In Marathi, Washim, Nashik, Divya Marathi

निसर्गाचा कोप सुरूच!,वाशीम, नाशिक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशीम / नाशिक - वाशीम जिल्ह्यात वादळी पावसानंतर गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी पहाटे 5 वाजेपर्यंत संततधार पाऊस झाला. त्यामुळे रिसोड तालुक्यातील ओढ्यांना पूर आला, तर पैनगंगेच्या पात्रातूनही पाणी वाहिले. या पावसामुळे हिवाळी पीक पूर्णत: हातून गेले असून अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले, भिंती खचल्या. पाळीव जनावरांचाही मृत्यू झाला.


गारपिटीमुळे बुधवारपर्यंत तब्बल पाच हजार 510 हेक्टर शेतजमिनीवरील पिकाचे पूर्णत: नुकसान झाले असून मधल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे हा आकडा आणखी वाढला आहे. गारपिटीमुळे जिल्ह्यातील संत्रा, मोसंबी, द्राक्ष, आंबे, डाळिंब, पपई या फळबागांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. मात्र, फळबागांचा पीक विमा योजनेत समावेश नाही. त्यामुळे शेतक-यांना मदत मिळेल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.


पूर्वीचीच मदत मिळेना : पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात तब्बल एक लाख 61 हजार 445 शेतक-यांचे 92 हजार 849.65 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. तसेच 24 हजार 644 घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले होते. या वेळी मदत घोषित होऊनही ती मिळाली नाही.


नाशिक जिल्ह्यात फळबागा झोपल्या
पाटोदा परिसरातील पिंपरी, सावरगाव, अंतरवेली, खैरगव्हाण, साबरवाडी, भाटगाव आदी गावामध्ये शुक्रवारी पहाटे गारांच्या शिडकाव्यासह मुसळधार पाऊस झाला. यात द्राक्ष, कांदा, डाळिंब उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने 30 हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज आहे.


रात्री बारानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. पिंपरी, सावरगाव, अंतरवेली या गावांमध्ये प्रथम गारांसह पाऊस पडला. द्राक्षाच्या अनेक बागा उन्मळून पडल्या. भाटगावमध्ये डाळिंबाच्या झाडांना आलेली फुले पूर्णपणे गळून पडली आहेत.