आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Various Complain Against Minister To Rahul Gandhi

मंत्र्यांविरुद्ध तक्रारींची राहुल गांधींपुढे जंत्री!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - मंत्री गेस्ट हाऊसवर मुक्काम करून परत जातात. बैठकांना येत नाहीत. कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, अशा शब्दांत राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापुढे मंत्र्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला. काहींनी तर मंत्री केले नसल्याची खंतही बोलून दाखवली. राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन राज्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याचा प्रस्तावही काहींनी राहुलपुढे ठेवल्याचे समजते.


सुराबर्डी मिडोज येथे पक्षाच्या ब्लॉक, जिल्हास्तरीय नेत्यांशी राहुल यांनी इन कॅमेरा संवाद साधला. चार जिल्हय़ांचा गट करून ते नेत्यांशी ‘वन टू वन’ बोलले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाही त्यांनी सोबत ठेवले नव्हते.


मराठवाड्यासह राज्यातील सुमारे 17 जिल्हय़ांमधील पदाधिकारी व ब्लॉकस्तरीय नेते यात सहभागी होते. तक्रारीनंतर राहुल राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांना सूचना देत होते.
उमेदवार निवड : निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांची मते विचारात घेतली जातील, अशी ग्वाही राहुल यांनी दिली.


पराभव का होतो : काँग्रेसचा पराभव का होतो, असा प्रश्न विचारत राहुल यांनी गटबाजी व समन्वयाच्या अभावाचा मुद्दा मांडला. गटबाजी सोडून पक्षाच्या कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.


मंत्र्यांना फटकारले : गडचिरोलीचे संपर्कमंत्री असलेले सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्याविषयी अहेरी तालुक्याचे अध्यक्ष मेहबूब अली यांनी तक्रारी केल्या. मंत्री गेस्ट हाऊसवर थांबून परत जातात. त्यांना आणि माणिकरावांना दोनशे पत्रे पाठवली, पण उत्तर आले नाही, असे ते म्हणाले. त्यावर राहुल यांनी देवतळे कोण आहेत, असे विचारले. देवतळे स्पष्टीकरण देण्यासाठी उभे ठाकले. तेवढय़ात राहुल यांनी ‘आप बोलिये मत’ असे म्हणत त्यांना खाली बसवले. नेत्यांशी संपर्क वाढवा, त्यांच्या बैठका घ्या, अशा सूचनाही त्यांनी देवतळेंना केल्या. लहानसहान गोष्टींसाठी मंत्र्यांकडे जावे लागते. मंत्रालयात कामांसाठी पैसे द्यावे लागतात, अशी व्यथा अकोला जिल्हय़ातील नेते शेख जब्बार यांनी मांडली. दरम्यान, पाच वेळा आमदार झालो, पण मंत्री केले नाही, अशी खंत विदर्भातील वामनराव कासावार यांनी बोलून दाखवल्याचेही सूत्रांनी सांगितले.
निवेदने नाकारली : प्रत्यक्ष भेट होत असल्याने अनेक नेत्यांनी राहुल यांना देण्यासाठी निवेदन आणली होती. मात्र, राहुल यांनी ती घेण्यास नकार दिला.
मीडियाला टाळले : सुराबर्डी येथे विचारमंथन सुरू असताना मीडियाच्या मंडळींना अमरावती मार्गावर फाट्यावरच रोखण्यात आले होते.
माइक घेऊन फिरले
अंतर कमी करण्यासाठी राहुल खुर्ची हातात घेऊन मंचावरून खाली आले आणि नेत्यांशी संवाद साधला. बैठकीत हातात माइक घेऊन फिरत फिरत राहुल गांधी बोलत होते.