आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपूर वारी मार्गातच झाडे लावण्यासाठी वारक-यांना देतात बिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आषाढी-कार्तिकीला पंढरपूरकडे दिंडी, वारी निघते. विठुनामाच्या गजरात वारकरी घाटमाथा, डोंगर रस्ते, द-या-खो-या, जंगलातून हजारो मैलांचा प्रवास करतात. ‘अरण्य’चे सदस्य त्यांना संकलित केलेल्या विविध वृक्षांच्या बिया देतात. वारकरी वाटेवर त्या टाकतात. पुढील वर्षाच्या वारीत या बियांचे रोपटे वारकऱ्यांचे स्वागत करतात.

महािवद्यालयीन तरुणांच्या संस्थेचा हा उपक्रम राज्यभर हिरवाई फुलवतोय. जैव विविधता जपण्याची भावना प्रत्येकाच्या मनात रुजावी या हेतूने राज मदनकर या तरुणाने सुरू केलेली ही चळवळ वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. २००७ मध्ये राजने एकट्याने सुरुवात केली. २०११ मध्ये ‘अरण्य’ संस्था आकाराला आली. २०१२-१३ मध्ये या तरुणांनी जंगलात जाऊन अडीच लाख बिया जमा केल्या. तर २०१४मध्ये ४३ वेगवेगळ्या झाडांच्या १४ हजार बीया जमविल्या. फुले व फळझाडांवर त्यांचा भर असताे. पूर्वी पक्षांच्या विष्ठेतून परागीकरण व्हायचे. आता फळझाडे नसल्याने पक्षांनाच खायला मिळत नाही. म्हणून नागरिकांनी घरात शोभेची तसेच प्लास्टिकची बनावट झाडे न लावता आपापल्या परिसरात फळझाडे व फुलझाडे लावावी, असे अावाहन मदनकर यांनी केले.

देशभर कार्य, ५०० कार्यकर्ते
औरंगाबादसह नागपूर, पुणे, ठाणे, दिल्ली व सुलतानपूर येथे संघटनेचे कार्य सुरू आहे. देशभरात ‘अरण्य’शी प्रत्यक्ष जुळलेले ४०० ते ५०० कार्यकर्ते आहेत. अप्रत्यक्षरीत्या या ना त्या कारणाने संपर्कात असलेले व सवड मिळेल तेव्हा काम करणारे १५ हजारावर लोक असल्याचे राज सांगतात.

वृक्ष दत्तक योजना
‘अरण्य’चे ४० ते ५० सदस्य आपापल्या परिसरात प्रत्येकी ११ झाडे लावून त्यांची कुटुंबातील सदस्याप्रमाणे देखभाल करतील. महिला सदस्य व मुलींनी वटपौर्णिमेला वडाची झाडे लावली.

बाणेर टेकडी दत्तक
पुणे भागात बाणेर टेकडी बांधकाम कंत्राटदारांनी घशात घालण्याचा घाट घातला होता. पर्यावरण व निसर्गप्रेमींच्या विरोधानंतर सरकारने बांधकामे स्थगित केली. ‘अरण्य’सह ज्येष्ठ नागरिकांची संस्था ‘वसुंधरा’ व डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी मिळून टेकडी दत्तक घेतली. झाडे लावून ती हिरवीगार करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
बातम्या आणखी आहेत...