आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराजधानीत कांद्यानंतर आता बटाटा रडवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- चवीने खाणार त्याला देव देणार ही झाली एक बाजू आणि देव देणार ते महागाई हिरावून घेणार, ही झाली दुसरी बाजू. उपराजधानीत सध्या हीच परिस्थिती आहे. मुळा आणि कोहळे अशा भाज्या वगळता सर्व भाज्यांनी दरांची साठी गाठली आहे, तर कांद्यानंतर आता बटाट्याने रडवण्याची तयारी केली आहे. कांदा 60 रुपये किलोवर स्थिर झाला आहे तर 15 ते 20 रूपये किलो असलेला बटाटा आता 25 ते 30 रुपये किलोवर गेला आहे. त्यामुळे सामान्यांच्या स्वयंपाकाची चव बिघडली आहे.

दिवाळीत आता भाज्यांनी रडवायचे ठरवले आहे. इतर सर्व वस्तूंवर एकावर एक फ्री पासून काही ना काही आकर्षक आॅफर असतात. भाज्यांवर मात्र आॅफर नसल्याने सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. कारण रोजच्या जेवणात भाजीशिवाय अन्न गोड लागत नाही. कांदा आणि बटाट्यापाठोपाठ फुलकोबी आणि गवार भाजीचे भाव वाढले आहे. या दोन्ही भाज्यांची आवक एकदम कमी झाल्याने भाव वाढल्याचे खामला बाजारातील भाजी विक्रेते श्रीकृष्ण गजभिये यांनी सांगितले. फुलकोबी 80 रुपये किलो आहे. गवार दिसतच नाही आणि असली तरी 100 रुपये किलोने आहे. त्यामुळे किलोभर भाजी नेणारा माणूस एक पाव भाजीवर आला आहे.

नागपुरात बंगाल आणि उत्तर प्रदेशातून बटाटा येतो. यु. पी. मधून सध्या बटाटा येत आहे. पण, बंगाल सरकारने बटाटे निर्यातीवर बंदी घातल्याने तेथील बटाटा येणे बंद झाल्याने भाव वाढले आहे. कळमना मार्केटमध्ये रोज 25 ट्रक बटाटा यायचा. तिथे आता 10 ते 15 ट्रक आवक आहे. त्यामुळे पुरवठा कमी असल्याने बटाट्याचे भाव वाढले आहे, अशी माहिती कळमना येथील अफजल ट्रेडिंग कंपनीचे मोहंमद अफजल यांनी दिली.

खामला बाजारात सोमवारी भाज्यांचे भाव
भाजी दर प्रती किलो
फुलकोबी 80
गवार 100
पालक 60
भेंडी 60
चपटा वाल 50
सिमला मिरची 70
पानकोबी 40
याशिवाय काकडी, मुळा, टमाटे व कोहळे 40 रुपये किलो आहे.