आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर गुंडाळले शासनाचे भाजीपाला विक्री केंद्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांना रास्त दरात भाजीपाला मिळावा, याकरिता शहरात गतवर्षी स्वातंत्र्यदिनी बसस्थानक चौकात भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच येथील भाजीपाला विक्री केंद्र पूर्णत: गुंडाळण्याची नामुष्की शासनावर ओढवली आहे.

या उपक्रमामध्ये वर्षभर नियोजनाचा अभाव दिसून आला. शेतकर्‍यांकडूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर प्रशासनानेही ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही गत झाल्याची भावना परिसरात उमटत आहे. कृषी आणि पणन विभागामार्फत गतवर्षी स्वातंत्र्यदिनी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले होते. उद्घाटनाच्या दिवसापासूनच थेट शेतमाल विक्री केंद्र वादग्रस्त ठरले होते. पहिल्याच दिवशी नियोजनाच्या अभावामुळे कृषिमंत्र्यांसह पाहुण्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. येथे लावण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये एका व्यापार्‍यानेही दुसर्‍याच्या माध्यमातून स्टॉल लावला होता, तर काही शेतकरी गटांनी केवळ शासनाच्या जबरदस्तीपोटी दोन-चार दिवस स्टॉल चालविला. त्यानंतर स्टॉलचे दिवस आणि वेळा यामध्ये ताळतंत्र राहिले नाही. चार महिन्यांपूर्वी हे केंद्र केवळ दोन स्टॉलवरून केवळ एका स्टॉलवर आले. रातचांदणा येथील प्रयोगशील शेतकरी अरविंद बेंडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांचा अखेरचाही स्टॉलही बंद झाला, तर दोन दिवसांपूर्वी या स्टॉलची नेट, बोर्ड, टेबल आदी साहित्यदेखील काढून ठेवण्यात आले. त्यामुळे राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी सुरू केलेले हे महत्त्वाकांक्षी केंद्र नियोजनाच्या अभावामुळे अखेर पूर्णत: गुंडाळावे लागल्याचे दुर्दैव ओढवले आहे.
वाहतूक, गोदाम, प्रचाराअभावी फटका
हा स्तुत्य उपक्रम नियमित आणि फायदेशीरपणे सुरू राहण्यासाठी महात्त्वकांक्षेची गरज होती. हा उपक्रम सुरू झाल्यानंतर याविषयी आढावा, प्रतिसाद, प्रतिक्रिया, ग्राहकांच्या तक्रारी, शेतकर्‍यांच्या अडचणी, बळकटीकरण अशा अनेक बाबींवर प्रशासनाची चर्चा होणे गरजेचे होते. मात्र, हा अभाव ठळकपणे दिसून आल्याने या केंद्राला उतरती कळा लागली. शेतमाल ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था; तसेच भाजीपाला हाताळणीसाठी क्रेट, पॅकिंग अशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. शासनाकडून या उपक्रमाचा मुळीच प्रचार, प्रसार झाला नाही. भाजीपाल्यासाठी तसेच उपयोगी साहित्यासाठी येथे गोदाम तसेच भाजीपाला विक्रीसाठी उन्हाळा व पावसाळ्यात उपयोगी येतील, अशा पक्क्या बांधकामाची गरज होती, जी कधीच पूर्ण झाली नाहीत.
विस्तारीकरणाचा कांगावा
या उपक्रमाचा विस्तार आर्णी, कळंब, पुसद, नेर, दारव्हा तालुक्यांत करणार असल्याचा कांगावा शासनाकडून करण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात कुठलीच महत्त्वाची बैठक, समिती, अभ्यास, आढावा, चाचपणी, प्रयत्न केले नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज जिल्ह्यात कुठल्याही तालुक्यात असे थेट शेतमाल विक्री केंद्र कार्यरत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

तक्रारींचा पाढा; नोंद मात्र नाही
मुंबई, पुणे येथे अशा पद्धतीची भाजीपाला, फळे विक्री केंद्रे यशस्वीपणे सुरू आहेत. शहरात मात्र काहीतरी सुरू करायचे म्हणून औपचारिकतेपोटी थेट भाजीपाला विक्री केंद्र सुरू झाले. भाजीपाला विक्री करणार्‍यांना शहरातील व्यापारी, अडते, दलाल, विक्रेत्यांपासून त्रास होता. ग्राहकांच्या तक्रारी होत्या. खुद्द कृषी अधिकार्‍यांच्याही काही तक्रारी होत्या. मात्र, त्याच्या अधिकृत नोंदी नसल्याची शोकांतिका आहे. याचा फटका आता सामान्य शेतकर्‍यांना बसत असून, थेट भाजीपाला विक्रीच्या माध्यमातून फायदा होईल असा त्यांना विश्वास होता.