महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भाने कायम निर्णायक भूमिका निभावली आहे. त्यामुळे विदर्भाचा कौल कोणाच्या बाजूने राहतो, हा सध्या चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय आहे. निवडणुकीच्या तोंडावर युती आणि आघाडीची बिघाडी झाली. त्यामुळे सर्व पक्षांसोबतच उमेदवारांचीच मोठी परीक्षा आहे. युती-आघाडीच्या राजकारणात कोणत्या भागात कोण किती पाण्यात आहे, याचा खरा अंदाज आता संबंधित पक्षांना येत आहे. मतदारांसमोरही बहुपर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मतदारराजा ऐनवेळी कोणाच्या पारड्यात कौल टाकतील, याचा अंदाज बांधने कठीण जात आहे.
वर्षानुवर्षे एका पक्षाची पालखी वाहणारे आता अचानक दुस-याच पक्षाचा झेंडा घेऊन मतांचा जोगवा मागण्यासाठी फिरताना दिसत आहेत. जात-पात तसेच पोटजातींची आकडेवारी सारिपाटावर मांडून विजयांचे दावे करण्याचे निवडणुकीचे परंपरागत गणित या वेळी पुरते बिघडले आहे. निवडणुकांमध्ये जाती-पातीच्या मतांची गोळाबेरीज करताना मतांचे विभाजन होऊ नये यासाठी नियोजन करण्यावर मोठा भर राहायचा आणि त्यात यशस्वी होणारे विजयाच्या जवळ जायचे, तसे वातावरण मतदान जवळ येईल तसे तापताना दिसून यायचे. या वेळी मात्र अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी झालेल्या युती-आघाडीच्या फाटाफुटीत हे नियोजन करण्याची संधीच कोणाला मिळाली नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी चौरंगी, पंचरंगी आणि बहुरंगी लढती होत आहेत. त्यात एकाच मतदारसंघात एकाच जातीचे अनेक उमेदवार असल्यामुळे सध्या कोण कोणाचे किती मत खाणार, यावर चर्चा रंगत आहे. त्याच आधारावर जय-पराजयाचे आराखडे बांधले जात आहेत. यात परंपरागत पद्धतीच्या प्रचारात आणि मत मागण्याच्या पद्धतीत थोडा बदल दिसत असून विकासाच्या मुद्द्यांना चांगलाच भाव आला आहे. भावनिक आवाहनापेक्षा
आपण आपल्या भागासाठी नेमके काय करणार, असे मतदारांनी विचारण्यापूर्वीच उमेदवार मतदारसंघाच्या विकासाचा विचार करत असल्याचे किमान चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन आणि विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भात सभा घेऊन भाजपविरोधात साद घातली आहे. २००९ मध्ये संपूर्ण विदर्भात ८ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना कौल मिळाला होता. शिवसेनेचे आमदार असलेल्या क्षेत्रात तसेच गेल्या वेळी थोड्या फरकाने उमेदवार दुस-या क्रमांकावर राहिलेल्या ठिकाणी त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. एक दोन जागा इकडे तिकडे झाल्या तरी साधारण एवढ्याच संख्येच्या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार चांगली लढत देताना दिसत आहेत.
राज ठाकरेंनीही ब्ल्यू प्रिंटचा प्रचार करत इतरांना विसरून माझ्या हातात सत्ता द्या, असे आवाहन केले. हे करताना त्यांनी सगळ्यांचाच ठाकरी शैलीत समाचार घेतला. राज ठाकरेंचे वक्तव्य आणि भाषणांना चांगला प्रतिसाद मिळाला त्यांनी टाळ्याही खूप मिळवल्या. मात्र त्यांचे किती उमेदवार विधानसभेची पायरी चढतात, याबद्दल सर्वत्र साशंकता व्यक्त होत आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बहुतांश उमेदवारांची मदार स्वत:च्याच प्रचारावर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिवंगत काँग्रेस उमेदवाराच्या पत्नीचे तिकीट कापून स्वत:च्या मुलालाच यवतमाळमध्ये उभे केले आहे. त्याला निवडून आणण्यासाठी ते तळ ठोकून बसले आहेत. वास्तविक पाहता २००९ च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण विदर्भाने काँग्रेसला भक्कम साथ दिली. काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वाधिक २४ उमेदवार हे विदर्भातून निवडून दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सध्या मात्र काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मतदारसंघ ढवळून निघतील, असा मोठा प्रचार होताना दिसत नाही. काही ठिकाणी सभा होत आहेत, पण त्यात स्टार प्रचारक कोणी दिसत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, तीन मंत्री तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष आपल्या भाग्याच्या फैसल्यासाठी फिरत आहेत, तेथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसची मदार
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सभांवर आहे, पण मोजक्याच सभांवर ते सर्वदूर प्रभाव पाडतील काय आणि मोदींच्या विकासरथाच्या अजेंड्याला कोणत्या मुद्द्यांवर रोखणार, हा प्रश्नही कायम आहेच.
विदर्भातून राष्ट्रवादीला ६२ पैकी अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. हे चारही उमेदवार स्वत:च्या ताकदीवर निवडून आले होते. त्यांनी त्यांचे बालेकिल्ले मजबूत बांधलेले आहेत त्यातील दोघे मंत्रीही राहिले. या चार उमेदवारांपैकी दोन उमेदवारांसमोर या वेळी तगडे आव्हान आहे.
भाजपने मात्र प्रचाराचे त्या तुलनेत चांगले नियोजन केले आहे. राज्यस्तरीय नेत्यांनी ब-याच मतदारसंघांत दौरा केला आहे तसेच टीव्ही, सोशल मीडिया आणि टीव्हीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचून कौल मागितला आहे. भाजपचे हायटेक प्रचाररथही तयार आहेत. यातच
नरेंद्र मोदींच्या सभा आणि त्याचे घराघरांत दिसणारे थेट प्रक्षेपण याचा मतदारांवर चांगलाच प्रभाव पडताना दिसत आहे. त्यांच्या प्रचाराचा झंझावात आणि त्यांच्यावर होत असलेली सर्वपक्षीय टीका यामुळे मोदींची चर्चा जोरात आहे. परिणामी, भाजप विरोधक असलेल्या सगळ्याच पक्षांमध्ये धडकी भरल्याचे चित्र आहे. मोदींचा प्रभाव मतदानापर्यंत कायम ठेवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
मतदारसंघांमध्ये चौरंगी, पंचरंगी चित्र दिसत असले तरी सध्याचे एकूण वातावरण भाजप उमेदवारांसाठी सकारात्मक आहे आणि लोकसभेसारखे चित्र दिसेल, असे वातावरण तयार होत असल्याचा भाजपला विश्वास वाटत आहे. लोकसभेत सगळ्याच ठिकाणी भाजप उमेदवारांना जे भरघोस यश मिळाले यात संबंधित उमेदवारांपेक्षा मोदी फॅक्टर महत्त्वाचा होता, हे विसरून चालणार नाही. भाजपची ताकद वाढल्याच्या अविर्भावात काही नेते आहेत. ती भाजपची ताकद आहे की मोदींची, याची गल्लत न करता निवडणुकीला सामोरे जाणे हे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. तेव्हा पंचरंगी लढतीच्या लढाईत सध्या निर्माण झालेले सकारात्मक वातावरण कायम ठेवून जनतेने ज्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपला स्वीकारले आहे, त्या विकासाची पूर्ती होईल या दृष्टीने सतर्क राहून प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. अन्यथा, पुन्हा मतदारांसमोर परंपरागत निवडणुकांना जवळ करण्याचा पर्याय राहील.
भाजपचे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले उमेदवार प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढत आहेत. आपला गड शाबूत ठेवून जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ते जिवाचे रान करत आहेत. याच सोबत माजी मंत्री नितीन राऊत, मनोहर नाईक, शिवाजीराव मोघे, अनिल देशमुख, विधानसभेचे उपाध्यक्ष वसंत पुरके, राज्यमंत्री राजेंद्र मुळक, रणजित कांबळे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत त्यांना आव्हान दिलेले काँग्रेसचे माजी मंत्री व भाजपच्या तिकिटावर उभे असलेले सुनील देशमुख यांच्यातील लढती प्रतिष्ठेच्या आणि चर्चेच्या आहेत.