आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vidarbh Region MLAs Agitation For IIM Before Assembly

विदर्भातील आमदारही आयआयएमसाठी आग्रही, विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ही संस्था औरंगाबादेत स्थापन करण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आंदोलन केल्यानंतर दोन दिवसांनीच याच मागणीसाठी विदर्भातील सर्वपक्षीय आमदारही आक्रमक झाले आहेत. भाजप, राष्ट्रवादीच्या आमदारांनी गुरुवारी विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन करून आयआयएम नागपुरात स्थापन करण्याची घोषणा सरकारने करावी, अशी मागणी केली.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये मराठवाडा आणि विदर्भावर या दोन भागांवर सतत अन्याय झाला आहे. भाजप- शिवसेना सरकारच्या काळात या दोन्ही प्रदेशांवरील अन्याय दूर होईल, अशी अपेक्षा तेथील जनतेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मंजूर झालेल्या आयआयएमवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आजवर सर्व कंपन्या आणि नामांकित शैक्षणिक संस्था पुणे, मुंबई परिसरात एकवटल्याने आयआयएमसारखी महत्त्वपूर्ण संस्था औरंगाबाद आणि नागपूर येथे स्थापण्याची मागणी होत आहे. आयआयएम हे नागपुरात स्थापण्याचे सरकारने निश्चित केल्याची माहिती मिळाल्यानंतर मराठवाड्यातील आमदारांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण संस्था पुन्हा मराठवाड्यात जाऊन विदर्भावर पुन्हा अन्याय होण्याची भीती विदर्भातील आमदारांना आहे. ही संस्था नागपुरात स्थापन व्हावी, यासाठी विदर्भातील भाजपचे आमदार आशिष देशमुख, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये, भाजपचे आमदार आकाश पांडुरंग फुंडकर, अमित सुभाष झनक यांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन केले.

उच्च शिक्षणाची सोय व्हावी
‘आजवर विदर्भावर अन्यायच झाला आहे. येथील उद्योगंधंदे, विदर्भाच्या विकासाचा निधी, शैक्षणिक संस्था मुंबई, पुणेकरांनी पळविल्या. त्यामुळे विदर्भ मागास असून येथील विद्यार्थ्यांना रोजगारासह उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुण्याकडे जावे लागते. आयआयएमसारखी संस्था नागपुरात स्थापन झाल्यास विदर्भातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जावे लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च कमी होईल, शिक्षणामुळे येणारे कर्जबाजारीपण दूर होईल, कंपन्या कँपस मुलाखती घेण्यासाठी नागपुरात येतील आणि विदर्भातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील’, अशी प्रतिक्रिया वैदर्भीय आमदारांनी दिली.