आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट नव्हे, बॅलेटच भारी; गडचिरोलीत 65 टक्के मतदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे भविष्य गुरुवारी मशीनबंद झाले. इतर नऊ मतदारसंघांत राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होत असताना गडचिरोलीत मात्र ‘बुलेट विरुद्ध बॅलेट’चा सामना रंगला होता. या सामन्यात बॅलेटचा नि:संशय विजय झाला असून पोलिसांच्या चोख बंदोबस्त आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

गडचिरोली जिल्ह्याचा 95 टक्के भूभाग हा गर्द वनाच्छादित आहे. जिल्ह्यातील बहुतांश जनता आदिवासी आणि निरक्षर आहे. त्यामुळे या भागात माओवाद्यांचे वर्चस्व आहे. लोकशाहीला विरोध करणार्‍या माओवाद्यांनी आदिवासी आणि इतर नागरिकांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी तसे फलक आणि पत्रकेही प्रसिद्ध केली होती. त्यामुळे या मतदारसंघात खरा सामना हा उमेदवारांमध्ये नसून माओवादी आणि प्रशासनात होता.

माओवाद्यांचे आव्हान स्वीकारून गडचिरोली पोलिस आणि निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. याचा सकारात्मक परिणाम गुरुवारी सकाळ 7 पासून बघायला मिळाला. सकाळी 8 वाजेपासून अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी 9 वाजेपर्यंत 11 टक्के, तर दुपारी 1 पर्यंत 44 टक्के मतदान पार पडले. माओवाद्यांचे घर म्हणून ओळखल्या जाणार्‍या धानोरा तालुक्यातील तुकुम या गावी दुपारी 1 वाजेपर्यंत 74 टक्के मतदान झाले होते. एकूणच गडचिरोली-चिमूर मतदारसंघात शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले.

झाडावर चढून सुरक्षा
गेल्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात 30 पोलिस शहीद झाले होते. हा अनुभव गाठीशी असल्यामुळे पोलिसांनी यंदा निवडणुकीचे अतिशय सूक्ष्म नियोजन केले होते. त्यानुसार प्रत्येक अर्धा किमी रस्त्यावर पोलिस आणि केंद्रीय व राज्य राखीव दलाचे शिपाई तैनात करण्यात आले होते. याशिवाय घनदाट जंगलातील रस्त्यांच्या कडेला असणार्‍या झाडांवरही पोलिस चढले होते. डोंगर, टेकड्यांवरही पोलिस तैनात करण्यात आले होते. याशिवाय रस्त्यांवरील वाहनांच्या सुरक्षेसाठी पुलांखाली पोलिसांच्या तुकड्या नेमण्यात आल्या होत्या.

एटापल्लीत चकमक, नक्षली पसार
दुपारी 3 वाजता मतदान बंद झाल्यानंतर ईव्हीएम मशीन मुख्यालयी परत आणत असताना एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा परिसरात नक्षल्यांनी एका निवडणूक पथकावर लांबून गोळीबार केला. याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षली जंगलात पसार झाले. यात कोणीही जखमी झाला नसून ईव्हीएम सुरक्षित असल्याचा दावा गडचिरोली प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेलिकॉप्टरनी दिवसभर टेहळणी
आपत्कालीन परिस्थितीत पोलिस आणि मतदान पथकांच्या मदतीसाठी गडचिरोली प्रशासनाने दोन हेलिकॉप्टरची मदत घेतली होती. या हेलिकॉप्टरच्या मदतीने गुरुवारी पोलिस अधिकार्‍यांनी दिवसभर गडचिरोलीच्या विविध भागांची आकाशातून टेहळणी केली. शांत आणि सुरक्षित वातावरणात नागरिक मतदानाचा हक्क बजावत असल्यामुळे अधिकार्‍यांनीही आनंद व्यक्त केला.