नागपूर - लाचलुचपतीच्या प्रकरणांचे तपास सुटसुटीत आणि संपूर्णत: पुराव्यानिशी असावेत यासाठी येत्या काळात एसीबीचा शंभर टक्के व्हिडिओ चित्रीकरणावर भर राहणार आहे. न्यायालयांतही त्याचा भक्कम पुरावा म्हणून वापर करता येणार असून त्या दिशेने एसीबीची पावले पडत आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरात सध्या एसीबी आघाडीवर असल्याचे सांगताना दीक्षित म्हणाले, लाच प्रकरणांच्या तपासाशी संबंधित पहिली तक्रार, आरोपी, साक्षीदारांचे बयाण, आरोपपत्र असे सर्व दस्तऐवज शंभर टक्के डिजिटलाइज स्वरूपातच तयार होत आहेत. न्यायालयानेही आमच्या या प्रयत्नांची स्तुती केली आहे. यापुढे व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या वापराचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. लाचखोर व्यक्तीचा
मोबाइलच्या माध्यमातून व्हिडिओ काढून तो अॅप्लिकेशनवर अपलोड करण्याची सोय एसीबीने उपलब्ध केली आहे. येत्या काळात त्याही पुढे जाऊन तक्रारदाराची तक्रार, लाचेचा सापळा, आरोपीचे बयाण, साक्षीदाराच्या बयाणासह सार्याच बाबींचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते न्यायालयात सादर करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. सध्या काही प्रमाणातच व्हिडिओ चित्रीकरण शक्य होत आहे. भविष्यात ते पूर्णपणे कशापद्धतीने अंमलात आणता येईल, यावर खात्यात विचार सुरू आहे. तक्रारदार, साक्षीदार आरोपी फितूर होण्याची शक्यता कमी राहील.
रक्कम मुदतीत परत देण्यावर भर
तक्रारदाराच्याज्या कामावरून लाचप्रकरण घडले, ते काम पूर्ण व्हावे, यासाठी आम्ही पुढाकार घेऊन पाठपुरावा करतो. लाच सापळ्यात वापरलेली लोकांची रक्कम विशिष्ट मुदतीत परत करण्यावर आमचा भर आहे. गडचिरोलीतील एका लाच प्रकरणात तर तक्रारदार कंत्राटदाराची कोट्यवधीची बिले थकलेली असताना त्यातील पै न् पै आम्ही मिळवून दिली, याकडे दीक्षित यांनी लक्ष वेधले.