आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये : विनायक मेटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र आव्हाड हे अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये,’ असा सल्लावजा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विनायक मेटे यांनी मराठा आरक्षण शेतकरी जागर परिषदेत बोलताना शनिवारी दिला.


नागपुरात कामगार कल्याण केंद्रात ही परिषद पार पडली. या वेळी बोलताना आमदार मेटे यांनी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट तोफ डागली. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि आपल्यात इतरांनी लुडबूड करू नये, असा इशाराही त्यांनी आव्हाडांना दिला. आव्हाड यांनी औरंगाबादेत एका कार्यक्रमात बोलताना मेटेंचे नाव न घेता त्यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पक्षविरोधात भूमिका न घेण्याचा सल्ला दिला होता. त्याचा उल्लेख करून आमदार मेटे यांनी पवार यांच्या कृपेने आव्हाडांना पद मिळाल्याने ते आपल्याला काय खडसावणार, असा सवालही उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य त्यांनी जेवढे केले नसेल, तेवढे आपण केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली शरद पवार यांच्याशी बरेचदा चर्चा झाली आहे. त्यामुळे त्यांनी उगाच आमच्या संबंधात नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नये. आव्हाड पूर्वी काय होते, त्यांचे कुणाशी संबंध आहेत, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आरक्षणविरोधी भूमिका घेऊन उगाच वाकड्यात शिरू नये, असा इशाराही आमदार मेटे यांनी या वेळी बोलताना दिला.

राज्य विधिमंडळात मराठा-कुणबी समाजाचे 161 आमदार असूनही कुणीही पुढे येत नाही, यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी पीकेव्हीचे माजी कुलगुरूडॉ. शरद निंबाळकर, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, विजय रसाळ, राजे मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंह भोसले यांच्यासह अनेक नेत्यांची परिषदेत भाषणे झाली. परिषदेस संपूर्ण विदर्भातून प्रतिनिधी सहभागी झाले होते.


आरक्षणावर सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी
सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करून आमदार मेटे यांनी आरक्षणाला विरोध करणा-या पक्षांना निवडणुकीत आडवे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला. राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. अन्यथा जनताच सरकारचा निकाल लावेल, असा दमही त्यांनी भरला. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ओबीसींमध्ये 25 टक्के आरक्षण हवे आहे. या मागणीसाठीच शिवसंग्रामने राज्यभर जागर सुरू केला आहे. सरकार जागे न झाल्यास शिवसंग्राम संपूर्ण राज्यात गोंधळ घातल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशाराही मेटेंनी दिला.