आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vote Hundred Percent, Sarsangh Chalak Mohan Bhagwat Urge Citizens

शंभर टक्के मतदान करा, सरसंघचालक मोहन भागवत यांचे जनतेला आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीचे कर्तव्य पार पाडण्याची संधी येत्या काळात मिळणार आहे. त्यामुळे शंभर टक्के मतदानाचे प्रयत्न व्हायला हवे. भावनेच्या भरात आणि संकुचित विचार मनात न आणता मतदान करा. पक्षांचे धोरण आणि उमेदवाराच्या चारित्र्याचे मूल्यमापन करून निर्णय घ्या, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी केले. संघाच्या रेशीमबाग मैदानावरील विजयादशमी उत्सवातील भाषणात त्यांनी तरुण आणि नवमतदारांचा विशेषत्वाने उल्लेख केला.

माजी खासदार व दिल्ली येथील प्रसिद्ध लेखक लोकेशचंद्र प्रमुख पाहुणे होते. या वेळी सरसंघचालकांनी विविध मुद्दय़ांवर यूपीए सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, देशातील एकूणच परिस्थितीपुढे सर्वसामान्य माणूस हतबल ठरला आहे. देशाच्या नेतृत्वाकडून पार निराशा झाली आहे. मात्र, आता त्यावर उपाय शोधण्याची संधी आहे. संघ राजकारण करीत नाही. उलट संघाच्या कामातच राजकारण आड येते. निवडणूक लढणार्‍यांसाठी राजकारण हा विषय आहे. इतरांसाठी निवडणूक हे राजकारण नाही तर कर्तव्य पार पाडण्याची संधी आहे. येत्या काळात मतदानाच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडण्याची संधी आहे. त्यातही तरुण व नवमतदारांचे प्रमाण मोठे राहील. त्यामुळे मतदार यादीत नाव तपासण्यापासून काळजी घेतली पाहिजे.

देशात तुष्टीकरणाची स्पर्धा
देशात अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची स्पर्धा सुरूच आहे, असा आरोप करताना डॉ. भागवत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यांना लिहिलेले पत्र, मुजफ्फरनगर दंगलीचा उल्लेख केला. दंगलीत विशिष्ट लोकांना हिंसाचारासाठी प्रोत्साहन दिले गेले. यातून हिंदू समाजाची उपेक्षा करण्याचे सत्ताधार्‍यांचे धोरण स्पष्ट होते, अशी टीकाही त्यांनी केली.

सरकार पक्षपाती
सरसंघचालक म्हणाले, काश्मीरातील विस्थापित हिंदूंचे पुनर्वसन अद्यापही झाले नाही. दुसरीकडे माजी दहशतवाद्यांचे पुनर्वसन जोरात सुरू आहे. या भागात लोकसंख्येचा समतोल बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नेपाळमार्गाचा वापर होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
. अलीकडेच किश्तवाड येथील घटना तेथील सरकारच्या पक्षपाती धोरणाचे निदर्शक ठरल्या आहेत.

मतांच्या लाचारीसाठी घुसखोरीकडे दुर्लक्ष
देशाच्या सुरक्षेवरील संकटाचे ढग कायम आहेत. भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करून चीन आणि पाकिस्तान आमच्या संयमाची परीक्षा घेत आहेत. भारताच्या चारही बाजूंना आपला प्रभाव वाढवून फास आवळण्याचे चीनचे प्रयत्न आहेत. आर्थिक बाजूनेही देशाला कमकुवत करण्याचे चीनचे प्रयत्न आहेत. त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची इच्छाशक्ती मात्र आमच्या नेतृत्वाकडे नाही. मतांच्या लाचारीसाठी घुसखोरीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. पंतप्रधानांचा अपमानही केला जातो. तरीही आम्ही चर्चेसाठी कसा काय आग्रह धरतो? असा सवाल डॉ. भागवत यांनी केला.


सरसंघचालक म्हणाले..
* निवडणुकीचे नाव जरी घेतले तरी माझ्यावर राजकारणाचे आरोप होतात.
*संस्काराच्या अभावापायी देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हे कुठेतरी थांबायला हवे.
*भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठे आंदोलन झाले. कडक कायदा मात्र आजही झाला नाही.
*काही भागात विकासाचा झगमगाट दिसत असला तरी गरीब वर्ग विकासापासून वंचितच आहे.
*आमचा देश महाशक्ती होणार, असे तीन-चार वर्षांपूर्वी म्हणायचो. आता नेमकी काय परिस्थिती आहे.