आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत ‘वेट अँड वॉच’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील जागा वाटपावर अद्याप शिक्कामोर्तब न झाल्याने शिवसेनेत सद्य:स्थितीत ‘वेट अँड वॉच’ दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोणती जागा आपल्या वाट्याला येईल, याबाबत संभ्रम कायम असल्याने इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.

महायुतीचे राज्यातील जागावाटप लवकर व्हावे म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या चर्चेला नमिंत्रणाला शिवसेनेने अद्याप उत्तर दिले नाही. वरिष्ठ पातळीवर होत असलेल्या वेगवान घडामोडींचा परिणाम जिल्ह्यातील राजकारणावरदेखील पडत असल्याचे दिसून येत आहे. जागा आणि संख्येबाबत बोलणी पुढे सरकत नसल्याने अनेकांच्या हृदयात धडकी भरली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत युतीने चार-चार, असे एकूण आठ जागा लढवल्या होत्या. नव्याने झालेल्या महायुतीत जिल्ह्यातील काही जागांवर मित्रपक्षानेदेखील दावा ठोकला आहे. रिपाइं (आठवले) गटाला बडनेरा मतदारसंघ हवा आहे तर, भारतीय जनता पक्षानेदेखील अचलपूर व तिवसा मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेला कोणत्याही स्थितीमध्ये जिल्ह्यातील एकही जागा सहयोगी पक्षाला द्यायची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचे कोडे सुटण्याऐवजी किचकट होत चालले आहे. वरिष्ठ स्तरावरूनदेखील हालचाली मंदावल्याने त्याचा परिणाम येथील राजकारणावर दिसून येत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याने कोणत्याच मतदारसंघात राजकीय पक्षाच्या इच्छुकांच्या हालचाली मंदावल्याचे चित्र आहे. या संधीचा लाभ घेत अपक्षांनी मात्र आतापासूनच मतदारसंघातील घरा-घरांपर्यंत पोहोचण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात पूर्वीचेच सूत्र कायम ठेवायचे, की जागांची संख्या कमी-जास्त करायची याबाबत अंतिम निर्णय होण्याची इच्छुकांना प्रतीक्षा आहे.
शिवसेनेमध्ये या इच्छुकांची दावेदारी
जागा वाटपाबाबत चर्चा पुढे जात नसली तरी इच्छुकांची दावेदारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. माजी खासदार अनंत गुढे, आमदार अभिजित अडसूळ, जिल्हा प्रमुख संजय बंड, विरोधी पक्षनेते प्रा. प्रशांत वानखडे, महानगर प्रमुख दिगांबर डहाके, दिनेश बूब, प्रवीण हरमकर, झुंगालाल मावस्कर, रमेश मावस्कर, रतीलाल पटेल, दिनेश नाना वानखडे, राजू वानखडे, प्रदीप बाजड, डॉ. राजेंद्र तायडे, उमेश यावलकर, बाळासाहेब भागवत, बंडू साऊत, सुरेश विटाळकर, नरेंद्र पडोळे, ओमप्रकाश दीक्षित, प्रकाश आवारे, शोभा लोखंडे यांचा दावेदारांमध्ये प्रामुख्याने समावेश आहे.