आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Warcha Loksabha Election 2014 Datta Meghe Latest News In Marathi

पराभव झाला तरी चालेल, पण काँग्रेसला मतदान करू नका; मेघेंच्या सल्ल्याने मतदार चकित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा - ‘अतिवृष्टी, गारपीट झाली तर शासन मदत करते. पण पुनर्वसनाचे प्रश्न शासनाने सोडवले नाहीत. हे त्यांचे अपयश आहे, पण त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागत आहे. तुमच्या समस्या कायम असताना मी मत मागावे इतका मी बेशरम नाही. पडलो तरी चालेल, तुम्ही काँग्रेसच्या विरोधात मतदान करा,’ असा सल्ला खुद्द काँग्रेसचे खासदार दत्ता मेघे यांनी पुनर्वसितांना दिला आहे.
वर्धा जिल्हय़ातील नेरी, वाढोणा, अंतरडोह आणि पिपरी येथील लोकांचे सालोड (हिरापूर) येथे पुनर्वसन करण्यात आले. या चारही गावांत मिळून तयार झालेल्या वस्तीला नेरी पुनर्वसन म्हटले जाते. या वस्तीला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी, शासनाचे पुनर्वसन अधिनियम 2013 च्या तरतुदीनुसार न्याय देण्यात यावा, प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना शासकीय नोकरीत त्वरित सामावून घ्यावे, आदी मागण्यांसाठी पुनर्वसितांनी अनेक आंदोलने केली. नेत्यांसह अधिकार्‍यांना निवेदनही दिले, पण कोणीच लक्ष दिले नाही. शेवटी या प्रकल्पग्रस्तांनी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्रक आणि गावात फलक लावले.
वर्धा मतदारसंघातून कॉँग्रेसतर्फे सागर मेघे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सागर यांचे पिता व विद्यमान खासदार दत्ता मेघे यांनी दोन दिवसांपूर्वी पुनर्वसन झालेल्या लोकांची भेट घेतली. या वेळी सुमारे तीनशे लोकांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. या व्यथा ऐकून खासदार गहिवरले व त्यांनी अक्षरश: लोकांची माफी मागण्यास सुरुवात केली.
काय म्हणतात खासदार : ‘गेल्या पाच वर्षांत हा प्रश्न माझ्यापर्यंत कोणीही आणला नाही, मला येऊन भेटले असते तर मी नक्की मार्ग काढला असता. आता तुम्हाला मत मागण्याची मला लाज वाटते. मला माफ करा. मी काम केले नाही तर तुम्हाला मत कोणत्या अधिकाराने मागू? मी इतका बेशरम नाही की, तुमचे प्रश्न सोडवले नाही तरी मत मागेन. शासनाने पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले नाही. तुमच्या या समस्या पाहून मीही या सरकारचा निषेध करतो. आतापर्यंत लोकशाही मार्गाने राजकारण केले, तेव्हा तुम्हीही तुमचा अधिकार वापरा, काँग्रेसविरोधात मतदान करा, मी पडलो तरी चालेल,’ असे खासदार म्हणताच उपस्थितही चकित झाले. काहींनी त्यांचे हे भाषण रेकॉर्डही केले आहे.
आमच्या समस्यांचे काय?
खासदार मेघे यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच ही पुनर्वसन वस्ती आहे. येथील नागरिकांनी वारंवार आंदोलने केली. पण कोणीही लक्ष दिले नाही. त्यांनी मनावर घेतले असते तर आमच्या समस्या मार्गी लागल्या असत्या. त्यांनीही दुर्लक्ष के ल्यामुळेच आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकावा लागला. डॉ. रामकृष्ण मिरगे, प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडणारे
होय..! मी बोललो
कोणी बोलत नाही, मी बोललो. त्यात काय वाईट केलं. त्या पुनर्वसितांच्या समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा आक्रोश होता, म्हणून तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकू नका, वाटल्यास आमच्या विरोधात मतदान करा, कोणाला करायचे तो तुमचा अधिकार आहे, असे म्हटल्याची कबुली खासदार दत्ता मेघे यांनी दिली.