आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यातील भूजल पातळीत झाली वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळीत 1.58 मीटरने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील भूजलसाठा 8.26 टक्क्यांनी वाढला आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने मे महिन्यात केलेल्या विहीर सर्वेक्षण निरीक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जून महिना संपत आला असूनही मान्सून दाखल झालेला नाही. याशिवाय भरपूर प्रमाणात झालेला सिंचन उपसा व पाण्याच्या अयोग्य नियोजनामुळे भूजल पातळी खालावली होती. मात्र, मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या पावसामुळे पातळीत वाढ झाल्याचे भूवैज्ञानिकांनी सांगितले. 2011 मध्ये अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने भूजल पातळीत घट झाली होती. परंतु, मागील पाच वर्षांची आकडेवारी पाहता, जिल्ह्यात सरासरी व समतोल पर्जन्यमान झाल्याने भूजल पातळी स्थिर आहे, किंबहुना वाढल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. तथापि, जिल्ह्यातील धारणी, अंजनगावसुर्जी व चांदूरबाजार येथील भूजल पातळी एक मीटरच्या आत आली आहे. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन व बचत केल्यास टंचाई भासणार नसल्याचे भूवैज्ञानिकांनी सांगितले. यंदा शंभर टक्के पर्जन्यमान झाल्यास जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरीपेक्षा अधिक वाढ होईल. मात्र, त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन तसेच ‘रूफ वॉटर हार्वेस्टिंग’ करावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

63 पाणलोट क्षेत्र : जिल्ह्यात एकूण 171 सर्वेक्षण विहिरी आणि 63 पाणलोट क्षेत्र आहेत. मान्सूनपूर्व व मान्सूननंतर असे जानेवारी, मार्च, मे व आॅक्टोबरमध्ये भूजलपातळी तपासण्यात येते. त्यासंबंधीचा अहवाल पाठवला जातो. दरम्यान, मागील पाच वर्षांच्या तुलनेत मे 2014 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात 1.58 मीटरने जिल्ह्यातील भूजलपातळी वाढल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

या कराव्यात उपाययोजना
भूजल पातळीत वाढ होण्यासाठी शेतकर्‍यांनी विहिरीच्या बाजूने खड्डा खोदून त्यामधील पाणी विहिरीत सोडावे. शेताच्या बाजूला बांध टाकून पाणी अडवावे. नागरिकांनी छतावरील पाणी एकत्रित जमा होईल, अशी तरतूद करावी. जलस्रोत बघून पाण्याची बचत तथा उपसा कसा कमी होईल, याकडे लक्ष द्यावे.
पाण्याचा एक थेंब महत्त्वाचा
४ पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने त्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्यावी. भूजलपातळी वाढण्यासाठी नागरिकांनी व शासकीय कार्यालयांनी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’साठी पुढाकार घ्यावा. शेतकर्‍यांनी पाणीसाठ्यानुसार पीक नियोजन करावे.
एम. एम. खटाटे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, अमरावती.