आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीच उठले जिवावर, जगणेही गेले वाहून!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - पाण्याला जीवन म्हटले जाते. मात्र वरूणराजा कोपल्यामुळे विदर्भात पाणीच आता लोकांच्या जीवावर उठले आहे. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागात मोठय़ा प्रमाणावर जीवित व वित्त हानी झाली. शेती खरवडून गेली, घरे पडली.

पूर्व विदर्भाला पावसाने झोडपून काढले आहे. पुरामुळे रस्ते बंद झाले. चंद्रपूर- हैदराबाद महामार्ग गुरूवारी बंद झाला होता. तसेच कोळसा ओला झाल्यामुळे चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रातील 4 संच बंद असल्याने वीज निर्मितीत घट आली आहे. या केंद्रात सध्या फक्त 3 संच सुरू आहेत. 2340 मेगावॅटऐवजी फक्त 402 मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. इरई धरणाचे सात दरवाजे दीड मीटरने उघडल्याने चंद्रपूर शहरात पाणी शिरले आहे. चंद्रपूर जिल्हय़ातील मूल येथे सलोनी संदीप ठिकरे ही बारा वर्षाची मुलगी घराची भिंत पडून ठार झाली.


अमरावतीत तिघे वाहून गेले
अमरावती जिल्ह्यातील मोश्री तालुक्यातील सालबर्डी येथील हत्तीडोहात पोहण्यासाठी उतरलेले दोन युवक गुरुवारी बेपत्ता झाले. ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात दावसा या गावातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर चांदूर बाजार तालुक्यातील एक तरुण गुराखी वाहून गेला. प्रवीण लालसिंग चव्हाण (24) असे त्याचे नाव आहे. जिल्हय़ातील दवड नाल्यात धारणी ते दादरा ही हॉल्टिंग बस पहाटे वाहून गेली. सुदैवाने प्रवासी आधीच बसमधून उतरल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. बडनेरा डेपोची ही बस बुधवारी रात्री दादरानजीक पोहोचली होती. दवड नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चालक अय्युब खान यांनी गाडी पुलाजवळच थांबवली. सर्व प्रवासी त्याच ठिकाणी उतरले. चालक अय्युब खान व वाहक जावेद खान हे बसमध्येच झोपले होते. पहाटे बस वाहून जात असल्याचे पाहून या दोघांनीही उड्या मारल्या.