आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Well Thought About Sevagram Ashram, Gandhiji Granddaugther Kulkarni Said

सेवाग्राम आश्रमाबद्दल आमच्या मनात स्मृतिभाव!,गांधीजींच्या नात सुमित्रा कुलकर्णींचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - महात्मा गांधीजींच्या सर्वच वस्तू प्रतीक आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही आश्रम प्रतिष्ठानसह सर्वांची जबाबदारी आहे. मधल्या काळात काही अनुचित घटना घडल्याने चिंता वाढली आहे; पण याबाबत आश्रम प्रतिष्ठानला सूचना देण्यासाठी किंवा हक्क गाजवण्यासाठी मी येथे आले नाही. कारण माझ्या मनात सेवाग्राम आश्रमाबाबत स्वामित्वभाव नाही तर एक स्मृतिभाव आहे, अशी स्पष्टोक्ती महात्मा गांधीजींची नात सुमित्रा कुळकर्णी यांनी गुरुवारी दिली.

महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची नात सुमित्रा कुळकर्णी यांनी कुटुंबासह सेवाग्रामला भेट दिली. नंतर बोलताना त्या म्हणाल्या, या आश्रमाशी आमचा केवळ भावनिक संबंध आहे. पण म्हणून काही मी या आश्रमावर अधिकार गाजवणार नाही. आश्रमाच्या सुरक्षेसंबंधात आपल्या घरासारखे स्वत:च संरक्षण करावे, त्यासाठी शासनावर अवलंबून राहू नये.


..अन् त्यांचं तोंड शिवलं!
याप्रसंगी सुमित्रा कुळकर्णी यांनी काही जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. महात्माजींच्या काळात आश्रमात राहत असताना भन्साली भाई नामक एक व्यक्तीही आश्रम परिसरात राहायचे. एकदा त्यांनी मौन पाळले होते, पण रात्री आश्रमात झोपले असताना एकाचा पाय त्यांच्या पायावर पडला आणि त्यांचे मौन सुटले. पण पुन्हा असे होऊ नये म्हणून त्यांनी चक्क तारांनी स्वत:चे तोंड शिवून घेतले.

गरीब-श्रीमंतांतील दरी वाढतेय
महात्मा गांधीजींनी स्वयंरोजगार सुरू करून अनेकांच्या हाताला काम दिले होते. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले होते. पण आता व्यापार वाढला, महत्त्वाकांक्षा व गरजा वाढल्या. यातूनच पैसाही वाढू लागल्याने गरीब-श्रीमंत दरीही वाढत गेली. आताच्या तरुणांमध्ये मेहनत करण्याची जिद्दही राहिली नाही. ते लवकर हताश होतात. त्यांना मार्गदश्रनाची व खर्‍या गांधीविचारांची गरज आहे.यासाठीसुद्धा खर्‍या अर्थाने गांधी विचारांची गरज आहे, असे कुळकर्णी म्हणाल्या.

स्मृतिदिनी विविध कार्यक्रम
महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी आश्रम परिसरात सकाळपासूनच कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. सकाळी प्रार्थना, त्यानंतर दिवसभर सूतयज्ञ करण्यात आला. दुपारी दोन वाजता ‘सेवाग्राम आश्रम आणि बापूंचे अद्यतन संदर्भ’ या विषयावर डॉ. अभय बंग यांनी मार्गदश्रन केले. याशिवाय अन्य कार्यक्रमही घेण्यात आले.

आश्रम परिसरात अनेकांनी भेटी दिल्यात.