आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wester Vidarbh Ground Report For Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

पश्चिम विदर्भाचा ग्राउंड रिपोर्ट: भाजप, काँग्रेसला मतविभाजनाचा लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांनी पश्चिम विदर्भाचा घुसळून काढलेला कानाकोपरा आणि तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेची प्रचारात झालेली पीछेहाट या सर्व घडामोडींचा प्रभाव प्रचाराच्या दुस-या टप्प्यात मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. लोकसभेप्रमाणेच मोदी फीव्हर कायम असून त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या परंपरागत मतदारांमध्ये सध्या संभ्रमाची भूमिका आहे.
काँग्रेस, भाजप आणि बसपात मतविभाजनाची सुतराम शक्यता नाही. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वऱ्हाडात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात मतविभाजनाची शक्यता आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मतविभाजनाचा हा फायदा भाजप आणि काँग्रेसच्या पथ्यावर पडणारा आहे.
अमरावती ( 0८ जागा)
काट्याच्या लढतीत शेखावतांना फायदा
अमरावतीमध्ये काँग्रेसचे रावसाहेब शेखावत आणि भाजपचे डॉ. सुनील देशमुख या दोघांभोवतीच निवडणूक केंद्रित आहे. देशमुख विरुद्ध शेखावत लढतीत शिवसनेचे प्रदीप बाजड यांच्यामुळे मतविभाजन होऊन त्याचा फायदा नेमका शेखावतांच्या पथ्यावर पडणारा आहे. मात्र, भाजपच्या स्टार प्रचारकांचा बोलबाला देशमुख यांना बळ देणारा ठरला आहे. अचलपूर मतदारसंघात प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि राष्ट्रवादीच्या वसुधाताई देशमुख यांच्यातच थेट लढत झाली आहे. मोर्शीमध्ये भाजपचे डॉ अनिल बोंडे, काँग्रेसचे नरेश ठाकरे आणि राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख या तिघांच्या पारंपरिक लढतीत शिवसेनेचे उमेश यावलकर मतदारांमध्ये प्रभाव पाडण्यात यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. अखेरच्या टप्प्यात यावलकर विरुद्ध डॉ. बोंडे अशी लढत अपेक्षित आहे. धामणगाव रेल्वे मतदारसंघात शिवसेना, मनसे यांच्यामुळे भाजपच्या परंपरागत मतदारांमध्येच मोठ्या प्रमाणात मतविभाजन दिसून येत आहे. मात्र, शुक्रवारी होणा-या नरेंद्र मोदींच्या सभेमुळे राजकीय वातावरण बदलले आहे. भाजपचे अरुण अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यातच थेट सामना रंगला आहे. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि त्यांची बहीण संयोगीता निंबाळकर यांच्याभोवती निवडणूक केंद्रित झाली आहे. अशा लढतीत काँग्रेसच्या यशोमतींना पुन्हा एकदा फायदा होणार आहे. बडनेरा मतदारसंघात दुस-या टप्प्यातील निवडणूक काँग्रेसच्या सुलभा खोडके आणि रवी राणा यांच्यातच रंगली आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे संजय बंड आणि भाजपचे तुषार भारतीय यांच्यातील मतविभाजनाचा फायदा सुलभा खोडकेंना होण्याची शक्यता आहे. मेळघाट मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजकुमार पटेल आणि विद्यमान आमदार कॉंग्रेसचे केवलराम काळे यांच्यातच सामना आहे. पटेल यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. दर्यापूरमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार अभिजित अडसूळ यांच्याविषयी असलेली नाराजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आणि माजी शिवसैनिक दिनेश बुब यांना फायदेशीर आहे.
बुलडाणा ( 0७ जागा)
मोदींच्या विराट सभेमुळे राजकीय चित्र पालटले
नुकत्याच झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेमुळे जिल्ह्यात मोदी फीव्हर दिसू लागला आहे. बुलडाण्यात शिवसेनेचे आमदार विजयराजे शिंदे , काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि भाजपाचे योगेंद्र गोडे अशा तिरंगी लढतीत योगेंद्र गोडे बाजी मारतील. मेहकरमध्ये शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर, कॉंग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे यांच्यातील लढतीत राष्ट्रवादीच्या अश्विनी आखाडेंच्या मतविभाजनाने रायमूलकर हेच विजयी होतील , असे चित्र आहे. चिखलीमध्ये कॉंग्रेसचे राहुल बोंद्रे आणि राष्ट्रवादीचे धृपतराव सावळे यांच्या लढतीत भाजपचे सुरेश खबुतरे यांनीही चांगलीच मुसंडी मारली आहे. मलकापूरमध्ये भाजपचे आमदार चैनसुख संचेती आणि कॉंग्रेसचे अरविंद कोलते यांच्यात प्रमुख लढत रंगली आहे. मात्र संचेती परिवाराच्या लोकप्रियतेमुळे या वेळेसही संचेती निवडून येऊ शकतात. सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रेखाताई खेडेकर आणि शिवसेनेचे शशिकांत खेडकर यांच्यातील थेट लढतीत भाजपचे गणेश मांटे यांचाही फायदा होऊ शकतो. खामगावमध्ये कॉंग्रेसचे दिलीप सानंदा आणि भाजपचे आकाश पांडुरंग फुंडकर यांच्यातील लढतीत फुंडकरांना अधिक अनुकूल वातावरण आहे. जळगाव जामोद या मतदारसंघात भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे आणि शिवसेनेचे संतोष घाटोळ यांच्यात लढतीत कुटे बाजी मारू शकतात.
अकोला ( 0५ जागा)
भारिप मतविभाजनाच्या लाभावर विजयाची समीकरणे
अकोला जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत भारिप बहुजन महासंघाचे वर्चस्व आहे. या निवडणुकीतही भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांची मते अन्य उमेदवारांच्या विजयात अडसर ठरण्याची शक्यता अधिक आहे. अकोला पश्चिममध्ये भाजपचे गोवर्धन शर्मा विरुद्ध राष्ट्रवादीचे विजय देशमुख यांच्या लढतीत शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन होणार आहे. अकोट मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संजय गावंडे, भाजपचे प्रकाश भारसाकळे आणि कॉंग्रेसचे महेश गणगणे यांच्यात तिरंगी सामना रंगला आहे. भारसाकळे यांचा पूर्वीचा दर्यापूर मतदारसंघ नजीकच असल्याचा फायदा भारसाकळेंना होणार आहे. अकोला पूर्वमध्ये भारिप बहुजन महासंघाचे आमदार हरिदास भदे, शिवसेनेचे गोपीकिसन बाजोरिया आणि कॉंग्रेसचे सुभाष कोरपे यांच्यात तिरंगी सामना रंगला आहे. हरिदास भदे यांच्या प्रभावामुळे अन्य उमेदवारांच्या विजयाची शक्यता कमी आहे. बाळापूरमध्ये भारिप बमंसचे बळीराम सिरस्कार विरुद्ध कॉंग्रेसचे नतीकोद्दीन खतीब असा थेट सामना आहे. कॉंग्रेसचे खतीब आणि राष्ट्रवादीचे मो. रुनका यांच्यातील मतविभाजनाचा फायदा सिरस्कार यांना होईल. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे हरीश पिंपळे विरुद्ध कॉंग्रेसचे श्रावण इंगळे या लढतीत पिंपळेंकडे कल झुकू शकतो.

यवतमाळ ( 0७ जागा)
माणिकराव ठाकरेंना पुत्रप्रेमाचा फटका
निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात यवतमाळमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पुत्रप्रेमांमुळे वाढलेल्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. कॉंग्रेसच्या विद्यमान आमदार नंदिनी पारवेकर यांचे तिकीट कापून थोरले सुपुत्र राहुल ठाकरे यांना तिकीट दिल्यामुळे महिला वर्गात कॉंग्रेसविरोधी लाट आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया विरुद्ध भाजपचे मदन येरावार असा सामना रंगला आहे. पुसदमध्ये नाईक परिवारातील राष्ट्रवादीचे मनोहरराव नाईक यांच्याविरोधात विरोधकांना अखेरपर्यंत सक्षम उमेदवार सापडला नाही . माजी आमदार शिवसेनेचे प्रकाश देवसरकर यांच्याशी नाईक यांची लढत रंगली असून त्यात नाईकच बाजी मारतील. आर्णी मतदारसंघात कॉंग्रेसचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि शिवसेनेचे संदीप धुर्वे यांच्यातील थेट लढतीत मतदारांच्या नाराजीचा या वेळी मोघेंना फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. मोघे यांच्याबाबत असलेल्या असंतोषामुळे या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार जिंकू शकतो. राळेगावमध्ये विधानसभेचे उपसभापती प्रा. वसंत पुरके कॉंग्रेसकडून आणि राष्ट्रवादीचे मिलिंद धुर्वे यांच्यातील लढतीमध्ये भाजपचे अशोक उईके हे बाजी मारण्याची शक्यता अधिक आहे. वणीमध्ये विद्यमान आमदार काँग्रेसचे वामनराव कासावार आणि शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यातील लढतीत नांदेकर विजयी होण्याचीच शक्यता वाढली आहे. उमरखेड मध्ये काँग्रेसचे आमदार विजय खडसे आणि राष्ट्रवादीचे मोहन मोरे यांच्यातील लढतीत भाजपाचे राजेंद्र नजरधने यांनी लढतीत स्थान मिळवले आहे. मात्र तिरंगी लढतीत खडसे विजयी होण्याचीच शक्यता अधिक आहे. दिग्रसमध्ये शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना पराभूत करणे सोपे नसल्याचे विरोधकांच्याही ध्यानात आले आहे. राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर यांच्या तुलनेत राठोड यांच्यासाठी वातावरण अनुकूल आहे.
वाशीम ( 03 जागा)
वाढता मोदी ज्वर निर्णायक
वाशीम जिल्ह्यात या वेळच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या फुटीचा फायदा कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडेल असे चित्र होते. मात्र मोदी यांच्या खामगावच्या सभेनंतर वाशीम जिल्ह्यातही राजकीय चित्र बदलले आहे. रिसोडमध्ये कॉंग्रेसने विद्यमान आमदार अमित झनक आणि भाजपचे विजय जाधव यांच्यात दुहेरी लढत रंगली असून जाधव फायद्यात राहू शकतात. भाजपचे आमदार लखन मलिक आणि कॉंग्रेसचे सुरेश इंगळे यांच्यात वाशीममध्ये थेट लढत झाली आहे. या लढतीत मलिक यांच्या लोकप्रियतेचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे मलिकच बाजी मारू शकतात. कारंजा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुभाष ठाकरे आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यातच थेट लढत रंगली आहे. विद्यमान आमदार प्रकाश डहाके यांचे राष्ट्रवादीने तिकीट कापल्याने सुभाष ठाकरे यांना फटका बसणार असल्याचे राजकीय चित्र आहे. या ठिकाणी पाटणी आणि ठाकरे यांच्यातीलच थेट लढतीत पाटणी बाजी मारतील.