आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Western Vidarbh: Battle Among Congress,BJP And Sena, Divya Marathi

पश्चिम विदर्भाचा ग्राउंड रिपोर्ट: कॉटन बेल्टमध्ये काँग्रेस, भाजप, शिवसेनेत द्वंद्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम आणि बुलडाणा हा भाग प्रामुख्याने कापूस उत्पादकांचा पट्टा. ‘व-हाड अन; सोन्याची कुऱ्हाड’ असे या भागाचे वर्णन केले जायचे. मात्र शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्याने सुखी वऱ्हाडचा जीर्ण होत चाललेला चेहरा जगासमोर आला. हा भाग लोकसभेत शिवसेना- भाजपला तर विधानसभेत कॉंग्रेसला कौल देत आला आहे. या वेळी युती आणि आघाडी तुटल्याने राजकीय गणितेही बदलली. आता सर्वच दिग्गजांना अस्तित्वासाठी झगडावे लागेल.
अमरावती
( 0८ जागा)
खरी चुरस काँग्रेस-भाजपत
लोकसभेच्या निवडणुकीत राज्याचे लक्ष अमरावतीकडे होते. यात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी राष्ट्रवादीच्या नवनीत कौर राणा यांचा पराभव केला. नवनीत यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीचे खंदे नेते संजय आणि सुलभा खोडके यांनी पक्ष सोडला. आता सुलभा खोडके कॉंग्रेसतर्फे बडनेरातून रिंगणात आहे. नवनीत यांचे आमदार पती रवी राणा विरुद्ध खोडके असा सामना आहे. शिवसेनेचे संजय बंड यांचीही बाजू भक्कम आहे. मात्र मराठा, कुणबी मतांच्या विभाजनामुळे रवी राणांचा मार्ग सुकर होऊ शकतो. अमरावतीत कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना भाजपने उमेदवारी दिल्याने निष्ठावंत भाजपाई नाराज आहेत. अमरावतीत भाजपचे सुनील देशमुख विरुद्ध कॉंग्रेसचे रावसाहेब शेखावत या आजी माजी कॉंग्रेस आमदारांमध्येच थेट लढत आहे. भाजप सेनेतील मतविभाजनाचा फायदा शेखावतांसाठी पोषक आहे. अचलपूर मतदारसंघातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांची राष्ट्रवादीच्या वसुधा देशमुख आणि शिवसनेच्या सुरेखा ठाकरे यांच्याशी लढत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील मतविभाजनाचा फायदा कडू यांना होऊ शकतो. मोर्शीत भाजपचे अनिल बोंडे आणि राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख यांच्यात थेट लढत आहे. मतदारसंघाचा इतिहास बघितला तर विद्यमान आमदार अनिल बोंडे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मेळघाटमध्ये राष्ट्रवादीचे राजकुमार पटेल आणि कॉंग्रेसचे केवलराम काळे यांच्यात लढत आहे. त्यात पटेलांचे पारडे जड आहे. तिवसा मतदारसंघात कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना त्यांची बहीण संयोगिता निंबाळकर यांनीच आव्हान दिले आहे. मात्र या ठिकाणी ठाकूर यांचा सामना भाजपच्या निवेदिता चौधरी यांच्याशी आहे. धामणगाव मतदारसंघात भाजपचे अरुण अडसडविरुद्ध कॉंग्रेसचे वीरेंद्र जगतापांची लढत हाेईल. यात जगतापांचे पारडे जड वाटते. दर्यापूरमध्ये शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ, राष्ट्रवादीचे दिनेश बुब आणि कॉंग्रेसचे सिद्धार्थ वानखडे या आजी माजी शिवसैनिकामध्ये रंगतदार लढत आहे.

* यवतमाळ ( 07 जागा)
चारही पक्षांना समान संधी
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा जिल्हा अशीच यवतमाळची ओळख. या जिल्ह्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप पक्षांना समान संधी आहे. यवतमाळमध्ये माणिकरावांचे सुपुत्र राहुल, राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांच्या लढतीचा फायदा भाजपचे मदन येरावार यांना होऊ शकतो. आर्णीत कॉंग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि शिवसेनेचे संदीप धुर्वे यांच्यातच थेट लढत आहे. मोघे यांच्याबाबतच्या नाराजीचा फायदा धुर्वें यांना हाेऊ शकताे. राळेगावात विधानसभेचे उपसभापती वसंत पुरके व राष्ट्रवादीचे मिलिंद धुर्वे यांच्यात लढत आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादीचे मनोहरराव नाईक यांचा सामना माजी आमदार शिवसेनेचे प्रकाश देवसरकर यांच्याशी आहे. मात्र नाईक परिवाराच्या लोकप्रियतेमुळे या मतदारसंघात इतर उमेदवारांच्या विजयाची शक्यता कमी आहे. वणीत कॉंग्रेसचे आमदार वामनराव कासावार आणि शिवसेनेचे विश्वास नांदेकर यांच्यात तर उमरखेडमध्ये कॉंग्रेसचे आमदार विजय खडसे आणि राष्ट्रवादीचे मोहन मोरे यांच्यात लढत आहे. त्यात खडसेंना अनुकूल वातावरण आहे. दिग्रसमध्ये शिवसनेचे आमदार संजय राठोड व राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर यांच्यात लढत आहे. राठोड यांना हा मतदारसंघ अनुकूल आहे.

* अकोला (५ जागा)
भारिप ठरणार निर्णायक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेत महत्त्वाचा वाटा असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांची मते अन्य उमेदवारांच्या जय पराजयात निर्णायक ठरतील. अकोला पश्चिममध्ये भाजपचे गोवर्धन शर्मा विरुद्ध राष्ट्रवादीचे विजय देशमुख यांच्यात थेट लढत आहे. तिसरे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे गुलाबराव गावंडेही किती मते घेतात यावर देशमुखांचे भवितव्य आहे. अकोला पूर्वमध्ये ‘भारिप’चे आमदार हरिदास भदे, शिवसेनेचे गोपिकीसन बाजोरिया आणि कॉंग्रेसचे सुभाष कोरपे यांच्यातील लढतीत भदे यांना फायदा आहे. बाळापुरात अपक्ष आमदार बळीराम सिरस्कार विरुद्ध कॉंग्रेसचे नतीकोद्दीन खतीब असा थेट सामना आहे. सिरस्कार हे भारिपच्या तिकिटावर उभे असल्याने प्रभावी ठरतील. लोकसभेच्या निवडणुकीत चांगले मताधिक्य असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपचे हरीश पिंपळे विरुद्ध कॉंग्रेसचे श्रावण इंगळे अशी थेट लढत होईल. श्रावण इंगळे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. अन्य उमेदवार नवखे आहेत. अकोट मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संजय गावंडे यांचा सामना भाजपचे प्रकाश भारसाकळे आणि कॉंग्रेसचे महेश गणगणे यांच्याशी आहे. भारसाकळे हे दर्यापूरमधून पाच वेळा आमदार झाले आहेत. या ठिकाणी भारसाकळे आणि गावंडे यांच्यातच थेट लढत आहे, त्यात भारसाकळेंचे पारडे जड वाटते.

* वाशीम ( 03 जागा)
घड्याळ, पंजासाठी पोषक वातावरण
गेल्या पाच टर्मपासून शिवसेनेचा खासदार विजयी करणा-या वाशीम जिल्ह्यात आता विधानसभेला युतीच्या फुटीचा फायदा कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडेल. वाशीममध्ये भाजपचे आमदार लखन मलिक आणि कॉंग्रेसचे सुरेश इंगळे यांच्यात थेट लढत होईल. मलिक हे भाजपचे तळागाळातले कार्यकर्ते आहेत. मात्र शिवसेनेचे शशिकांत पेंढारकर यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या उमेदवाराला फटका बसणार आहे. कारंजा मतदारसंघातून राष्ट्रवादीने आमदार प्रकाश डहाके यांच्याऐवजी सुभाष ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसनेचे आमदार राजेंद्र पाटणी भाजपकडून रिंगणात आहेत. या ठिकाणी पाटणी आणि ठाकरे यांच्यातच थेट लढत होईल. सुभाष ठाकरे यांना पाटणी असंतोषाचा फायदा होईल. रिसोडमध्ये कॉंग्रेसने विद्यमान आमदार अमित झनक यांनाच उमेदवारी दिली आहे. २००९ मध्ये कॉंग्रेसचे सुभाष झनक या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र मध्यंतरी त्यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी या मतदारसंघात विधानसभेचेही पोटनिवडणूक घेण्यात आली. देशभर मोदी लाट असूनही रिसोडमध्ये मात्र झनक यांचा मुलगा व कॉंग्रेसचे उमेदवार अमित झनक विजयी झाले.
त्यामुळे भाजपच्या विजय जाधव यांच्याशी लढत असली तरी अमितच बाजी मारतील, असे चित्र आहे.

* बुलडाणा ( 07 जागा)
मोदी लाटेचा प्रभाव कायम
कॉंग्रेस आणि भाजपचे वर्चस्व असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील वातावरण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपला अधिक पोषक बनले आहे. नरेंद्र मोदी यांच्या लाटेचे प्रतिबिंब ख-या अर्थाने या विधानसभा निवडणुकीतही बुलडाणा जिल्ह्यात बघायला मिळेल. बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार विजयराजे शिंदे आणि कॉंग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ यांच्यात थेट लढत होत आहे. हा संघर्ष भाजपच्या योगेंद्र गोडे यांच्या पथ्यावर पडू शकतो. मेहकरमध्ये शिवसनेचे विद्यमान आमदार संजय रायमुलकर आणि कॉंग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे यांच्यातच थेट लढत होणार आहे. या लढतीत रायमूलकर हे प्रभावी ठरू शकतील, असे चित्र आहे. चिखली मतदारसंघात कॉंग्रेसचे राहुल बोंद्रे आणि राष्ट्रवादीचे धृपतराव सावळे हेच दोन प्रमुख प्रतिस्पर्धी राहतील. या वेळी मतदारसंघातील जनतेमध्ये बोंद्रे विरोधात नाराजीचा सूर असल्याने त्याचा धृपतराव सावळेंना फायदा होऊ शकतो. मलकापूरमध्ये भाजपचे आमदार चैनसुख संचेती आणि कॉंग्रेसचे अरविंद कोलते यांच्यात प्रमुख लढत होईल. मात्र संचेती परिवाराची लोकप्रियता या वेळेसही त्यांना विधानसभेत घेऊन जाईल, असे चित्र सध्या तरी दिसत आहे. सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार डॉ राजेंद्र शिंगणे निवडणूक लढवत नाहीत. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या रेखाताई खेडेकर आणि शिवसेनेचे शशिकांत खेडकर यांच्यातच थेट लढत होईल. खेडेकर यांपूर्वी भाजपच्या आमदार होत्या. खामगावमध्ये कॉंग्रेसचे दिलीप सानंदा आणि भाजपचे आकाश फुंडकर यांच्यात पारंपरिक लढत होईल. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आकाशचे वडील पांडुरंग फुंडकर यांच्याशी सानंदा यांचा सामना व्हायचा. मोदी लाटेचा प्रभाव खामगावमध्ये दिसेल. जळगाव जामोदमध्ये भाजपचे आमदार संजय कुटे आणि शिवसेनेचे संतोष घाटोळ यांच्यात लढत होईल. मात्र स्वच्छ प्रतिमा आणि मोदी लाटेच्या प्रभावाचा कुटेना फायदा होऊ शकतो.