आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘व्हाॅट्सअॅप ग्रुप’चा अनाथ मुलींना अाधार, शिक्षण-वसतिगृहाची केली मोफत सोय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सोशल मीडियाच्या गैरवापराबद्दल सारेच एकजात कंठशोष करतात. व्हाॅट्सअॅप, फेसबुक, टि्वटर या सोशल मीडिया साइटवर लोक वाट्टेल तसा धुमाकूळ घालतात. पण, ‘तलवार’ कोणाच्या हाती लागते, यावर तिचा उपयोग अवलंबून असतो. सोशल मीडियाचेही असेच आहे. समदृष्टी क्षमता विकास आणि अनुसंधान मंडळ, सक्षम तसेच दान पारमिता या उपक्रमाचे संयोजक अविनाश संगवई हे ‘व्हाॅट्सअॅप’ ग्रुपच्या आर्थिक मदतीतून दरवर्षी ३० अनाथ वा एकल पालक (आई) असलेल्या मुलींच्या शिक्षणास व वसतिगृहातील निवासाची माेफत साेय करतात.

शिक्षणाची दारे कायमची बंद झालेल्या या मुली फार तर पाचवी-सातवीपर्यंत शिकतात आणि नंतर घरकामाला जुंपल्या जातात, पण या ‘व्हाॅट्सअॅप’ ग्रुपच्या आर्थिक मदतीतून त्यांना शिक्षणाची दारे खुली झाल्याने त्यांच्या आनंदाचे क्षितिज विस्तारले आहे. यापैकी तीन मुली या वर्षी ६५ ते ९० टक्के गुण घेऊन दहावी उत्तीर्ण झाल्याचे संगवई यांनी सांगितले. वसुंधरा चॅरिटेबल सोसायटीचे नागेश पाटील या मुलींच्या वसतिगृहाची व्यवस्था पाहतात. या मुलींचे निवास, भोजन तसेच शिक्षणाची व्यवस्था नि:शुल्क आहे. स्वच्छता, नीट-नेटकेपणावर येथे भर दिला जातो. या मुलींना प्रमुख सणांना नागपुरातील एका घरी निमंत्रित केले जाते.

देणा-याचे हात हजाराे
अविनाश संगवई यांचा दान पारमिता नावाने ‘व्हाॅट्सअॅप’वर ग्रुप आहे. ६० ते ६५ जण असलेल्या या ग्रुपवर वसतिगृहातील मुलींच्या शिक्षणासाठी येणारा खर्च वा एखाद्या कार्यक्रमासाठी लागणारा खर्च टाकला जातो. ग्रुपमधील प्रत्येक जण वेगवेगळ्या ‘व्हाॅट्सअॅप’ ग्रुपवर असतो. ‘दान पारमिता’ ग्रुपवरील मेसेज प्रत्येक जण आपापल्या ग्रुपवर पोस्ट करताे. त्यातून अनेक दान दाते पुढे येतात. मुंबईतील एका परिवाराने दर रविवारी वसतिगृहातील मुलींना लागणा-या नाष्ट्याचा खर्च उचलला, तर ‘प्रकाश आमटे - द रियल हीरो’ या चित्रपटाचा खर्चही ग्रुपमधील एकाने केला.

मुलींना होणार हेमलकसा दर्शन
अविनाश संगवई यांचा मुलगा अभिनय हा मुंबई येथे पेट्रोफॅक कंपनीत आहे, तर सून प्राजक्ता गृहिणी आहे. अभिनयच्या कंपनीच्या मित्रांनी या मुलीसाठी १८ हजार दिले, तर प्राजक्ताच्या व्हाॅट्सअॅप ग्रुपने ३, असे एकूण २१ हजार जमले. यातून या मुलींना आता हेमलकसा येथे नेऊन प्रकाश आमटे यांचे कार्य व लोकबिरादरी प्रकल्प दाखवण्यात येणार आहे.