नागपूर - वन विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी वन मंत्रालयाने जालीम उपाय शोधला आहे. या खात्यातील संवेदनशील पदावर एखाद्या अधिका-याची नियुक्ती करण्यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) संबंधिताच्या चारित्र्याची, प्रामाणिकपणाची खात्री पटवून घेतली जाणार अाहे. त्यासाठी विभागातील संवेदनशील पदांची यादी तयार करून ती ‘एसीबी’कडे दिली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मागील आठवड्यात नागपुरात भारतीय वन सेवेतील (आयएफएस) अधिकारी दीपक भट यांना १९ लाखांच्या बेहिशेबी रकमेसह पकडण्यात आले हाेते. त्यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा नोंदवून निलंबितही करण्यात अाले. वन विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्यांपोटी भट यांना ती रक्कम मिळाल्याची चर्चा विभागात आहे. एसीबीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू अाहे. मात्र, या प्रकरणाने खडबडून जागे झालेल्या वन मंत्रालयाने काही पावले तातडीने उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
संपत्ती अन् प्रतिमाही तपासणार
भ्रष्टाचारासंदर्भात किती अधिका-यांची विभागीय चौकशी सुरू आहे, किती अधिका-यांवर एसीबीच्या धाडी पडल्या, याचा डेटा तयार केला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विभागातील निवडक संवेदनशील पदांवर अधिका-यांच्या बदल्या, नियुक्त्या करताना आता ‘एसीबी’कडून संबंधित अधिका-याच्या प्रामाणिकपणाची खात्री करून घेतली जाणार आहे. अधिका-याने बाळगलेली संपत्ती आणि विभागातील त्याची प्रतिमा तपासून पाहिली जाणार आहे. त्यानंतरच नियुक्तीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यासाठी वन विभागाने संवेदनशील पदांची यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. सर्वच वर्गवारीतील किमान २० ते २५ पदांची ही यादी ‘एसीबी’कडे सोपवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अाचारसंहिता करणार
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, बदल्यांचे स्वत:जवळील अधिकार काढून घेऊन ते आम्ही अधिका-यांना दिले. त्यामुळे अधिकारी कसेही वागतात, असा अनुभव आहे. त्यावर उपाय म्हणून अाता ही उपाययोजना करणार आहोत. बदल्यांसाठी निकषही तयार करीत आहोत. खालच्या पासून वरच्या स्तरापर्यंतच्या कामकाजासाठी आचारसंहिता तयार करण्याचे काम सुरू असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.