आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेब, आमचेही दु:ख जाणून घ्या! आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पत्नीचे निवेदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - मुसळधार पावसाने विदर्भातील शेतीचे मोठे नुकसान झाले. कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाने आधीच कंबरडे मोडलेला बळीराजा त्यामुळे अधिकच संकटात सापडला आहे. याच कारणावरून दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भ दौर्‍यावर येणार्‍या मुख्यमंत्र्यांनी आमच्याही व्यथा ऐकाव्यात, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पत्नींनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 911 मिमी पाऊस पडतो. मात्र या वर्षी दोन महिन्यांतच सुमारे 85 टक्के पावसाची सरासरी पूर्ण झाली आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांना पूर आले, तर शेतजमीन खरडून गेली. दुबार, तिबार पेरणी करूनही हाती काहीच उरले नाही. ओल्या दुष्काळाच्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री शनिवारी विदर्भात येत आहेत.

मदतीची मागणी
ठाणेगाव (जि. यवतमाळ) येथील अनिल मरापे या तरुण शेतकर्‍यानेही 19 जुलै रोजी ओल्या दुष्काळाच्या कारणामुळे आत्महत्या केली, असा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे. मरापे कुटुंबीयांना सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी अनिल यांची पत्नी राधाबाई व विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे.

सांगा, जगायचं कसं?
पावसामुळे 20 एकर शेतातील बियाणे वाहून गेले, जमीनही खरडली. या संकटामुळे यवतमाळ जिल्ह्यातील मंगी येथील संतोष सिडाम या शेतकर्‍याने 23 जुलै रोजी आत्महत्या केली. संतोषच्या पश्चात पत्नी, अनुक्रमे एक वर्ष व एक महिन्याची अशा दोन मुली आहेत. त्याचे वडील सरकारी नोकरीत होते, मात्र त्यांचा पगारही रोखण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आम्ही जगायचं तरी कसं, हा प्रश्न संतोषची पत्नी कविता हिने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.