आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वन्यप्राणीही उठले जिवावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्शी - मागील खरीप व रब्बी हंगामात अतिवृष्टी व गारपिटीने आर्थिकदृष्ट्या जायबंदी झालेल्या शेतकर्‍यांची चालू हंगामात उभी राहण्याची धडपड सुरू असताना वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे कोलमडण्याची पाळी तालुक्यातील शेतकर्‍यांवर आली आहे.

मागील हंगामात अतिवृष्टी व गारपिटीमुळे सोयाबीन, हरभरा, तुरीला जबर फटका बसल्यामुळे बेभाव माल विकून शेतकर्‍यांचा आर्थिक कणा मोडला आहे. अशा परिस्थितीत चालू हंगामात भारनियमन, तापणार्‍या उन्हात रात्रंदिवस मेहनत करून मान्सूनपूर्व कपाशी व मिरचीचे पीक फुलवू पाहणार्‍या शेतकर्‍यांच्या स्वप्नांचा हरिण, रोही आदी वन्यप्राण्यांनी अक्षरश: चुराडा केला आहे. खरीप हंगामातील मिरचीची लागवड ही शेतकर्‍यांना अडचणीच्या वेळी पैसा देणारे नगदी पीक आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिरची रोपाची लागवड केली. मात्र, पावसाअभावी हिरव्या चार्‍याच्या शोधात फिरणार्‍या वन्यप्राण्यांच्या कळपाने शेतातील मिरची पीक फस्त केल्याने शेतकर्‍यांपुढे नवीन संकट निर्माण झाले आहे. यात मान्सूनपूर्व कपाशीचाही समावेश आहे.
मोर्शी तालुक्याला लागूनच मध्य प्रदेश सीमेवर सातपुडा पर्वताची रांग गेली आहे. येथे जंगल मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात वन्यप्राण्यांची संख्याही मोठी आहे. येथील वन्यप्राणी जंगलालगत असलेल्या महाराष्टÑातील शेती पिकांचे दरवर्षी अतोनात नुकसान करतात. पेरणीयोग्य पाऊस झाला नसला, तरी ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे, अशा शेतकर्‍यांनी कापूस व मिरचीची लागवड केली आहे. पावसाळा लांबल्याने जंगलात सध्या हिरवा चारा उपलब्ध नाही. त्यामुळे चार्‍याच्या शोधात फिरणारा वन्यप्राण्यांचा कळप कापूस व मिरची पिकांवर ताव मारताना दिसत आहे. त्यामुळे जमिनीतून वर येताच पीक नष्ट होत असल्याने शेतकर्‍यांचा जीव तीळतीळ तुटत आहे. वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे अंबाडा परिसरातील बेलखेडा येथील शेतकरी त्रस्त झाले असून, वांगी, पालक, टमाटर आदी भाजीपाल्याची प्रचंड प्रमाणात नासाडी होत आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे कितीही नुकसान झाले, तरी शेतकर्‍यांना वन्यप्राण्यांना हात लावण्याचा अधिकार नाही. त्यामुळे डोळ्यांदेखत होणारे नुकसान पाहण्याशिवाय शेतकर्‍यांपुढे दुसरा पर्याय उरलेला नाही.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या व्यथा त्यांच्याच शब्दांत...
ठोस उपाययोजना हवी
४पावसाळी पीक उबीवर येताना वन्यप्राणी अर्ध्यामधूनच पीक फस्त करतात. शासनाची मदत फारच तुटपुंजी मिळते. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करावी.
जागोराव तागडे, शेतकरी.
राखण किती करावी ?
४शेतालगत जंगल असल्याने जंगली जनावरे त्या ठिकाणी दडून बसतात. वर्दळ शांत झाल्यानंतर शेतात येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. शेवटी राखण करावी तर कशी?
निरंजन बागडे, शेतकरी.
तक्रार करून थकलो
४ वनचर प्राण्यांचा तिन्ही ऋतूंमध्ये शेतात मुक्त संचार सुरू असतो. वनविभागाला तक्रार देऊन थकलो; परंतु अजूनपर्यंत वनविभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही.
मनोहर अंबाडकर, शेतकरी.
सांगा, आता शेतकर्‍यांनी जगावे तरी कसे?
४ शेतात मुंगी, वन्यप्राणी, चोर या सर्वांचा वाटा असतो, परंतु, पेरलेले पीकच नष्ट होत असेल तर, शेतकर्‍यांनी जगावे कसे?
शेषराव राऊत, शेतकरी.
नुकसान झाल्यास अहवाल पाठवतो
४ बेलखेडा हा परिसर जंगलालगत असल्याने वन्यप्राण्यांचा नेहमीच त्रास होतो. नुकसान झाल्यास सर्व्हे करून अहवाल वनविभागाला पाठवतो. शेतकर्‍यांना अनेकदा मदतही मिळाली आहे.
जी. पी. माकोडे, पटवारी, बेलखेडा.
सौरऊर्जेचे कुंपण ठरू शकते फायदेशीर
सौरऊर्जेचे करंट कुंपण लावून शेतीचे रक्षण केले जाऊ शकते. परंतु, कृषी विभागाकडे अशी योजना नाही. बँकेमार्फेत यावर तोडगा निघू शकतो.
अशोक डोंगरे, कृषी अधिकारी (अतिरिक्त पदभार ),मोर्शी.