आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Responsible For Increasing Crime Against Them Dr.Mirge

वाढत्या अत्याचाराला महिलाही जबाबदार, मह‍िला आयोगाच्या सदस्य डॉ. मिरगे यांचे अजब तर्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महिलांवरील वाढत्या अत्याचाराला महिलादेखील काही अंशी जबाबदार आहेत. महिला, मुलींनी आपण काय करतोय, कुठे जातोय याबद्दल सारासार विचार करायला हवा. केशभूषा, वेशभूषा, देहबोली निमंत्रक स्वरूपाची तर नाही ना, याचेही भान राखावे, अशा शब्दांत महिला आयोगाच्या सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी मंगळवारी अजब तर्कट मांडले. यावरून सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या युवती काँग्रेसच्या मेळाव्यातही मिरगे यांनी असेच विचार मांडले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी पुनरुच्चार केला. असंख्य घटनांचा मी अभ्यास केला. त्यातूनच हे स्पष्ट मत मांडत आहे. समाजात विकृती वाढत आहे; पण अत्याचारांना महिलाही जबाबदार आहेत. एकाकी, असुरक्षित ठिकाणी जात नाही ना, याचा विचार त्यांनी करायला हवा. अत्याचार लगेच थांबणार नाहीत. यासाठी जाणीव-जागृती गरजेची आहे, असेही त्या म्हणाल्या. आयोगातर्फे महिला मेळावे घेतले जातील. कॉलेजात शिबिरे घेण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
राजकीय नियुक्त्यांवर मौन : काही संघटनांनी समांतर महिला आयोग स्थापन केला आहे, याकडे लक्ष वेधले असता त्यात काहीही गैर नसल्याचे मिरगे यांनी सांगितले. महिला आयोगावर राजकीय नेत्यांच्या नियुक्त्या होण्याच्या प्रकारावर त्यांनी मौन बाळगले.
साडी, अंगभर कपडे घातले तरी बलात्कार होतात : शर्मिला ठाकरे
महिला आयोगाच्या सदस्य महिलेने केलेले हे वक्तव्य मूर्खपणाचे आहे. साडी, नऊवारीतील आणि अंगभर कपडे घातलेल्या महिलांवरही बलात्कार होतातच ना? दिल्लीतील निर्भयाच्या अंगावर पंजाबी ड्रेस होता. लहान मुलींवर अत्याचार होतात, तेव्हा त्या काही कोणाला हावभाव करत नसतात, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया नोंदवली.