अमरावती - ज्येष्ठ नागरिकांच्या पोलिसांसंदर्भातील समस्या, तसेच त्यांच्या सुरक्षेचा एक भाग म्हणून महिला पोलिस अधिकार्यांचे पथक शहरातील सर्व ज्येष्ठांना भेटी देणार आहेत.
रहाटगाव परिसरातील अत्याचार प्रकरणानंतर पोलिस आयुक्तांनी नुकतेच महिला अधिकार्यांच्या नेतृत्वात सहा पथकांची स्थापना केली आहे. निर्जनस्थळी फिरणार्या महाविद्यालयीन जोडप्यांवर कारवाईसाठी नेमलेल्या महिला अधिकार्यांच्या पथकाला ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे.
उपनिरीक्षक सुनीता काळे, प्राजक्ता धावडे, एम. जी. बन्सोड, शीतल निमजे, भोई आणि मसाये या सहा अधिकार्यांकडे पथकप्रमुख म्हणून नेतृत्व देण्यात आले आहे. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील सुभाष कॉलनीमध्ये काही दिवसांपूर्वी घरात घुसून वृद्धेचा गळा आवळून 42 ग्रॅम सोने लंपास करण्याची घटना घडली होती. त्या आरोपींचा अद्याप सुगावा लागला नाही. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना सुरक्षितता मिळावी, आधार मिळावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांकडे 218 ज्येष्ठ नागरिकांची नोंद आहे.