आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक सर्जरी दिवस: एका शस्त्रक्रियेने बदलू शकते तुमचे आयुष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- प्लास्टिक सर्जरीविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर अनभिज्ञता आहे. प्लास्टिक मटेरियलचा प्लास्टिक सर्जरीबरोबर कुठलाही संबंध नाही. केवळ नाव समान असल्याने, हा गोंधळ होतो. प्लास्टिक सर्जरी करण्याबाबत रुग्णांमध्ये जागरूकता नाही. त्यामुळे अनेकदा उपचार शक्य असतानाही रुग्णांना ही सोय उपलब्ध होत नसल्याची खंत प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जन डॉ. उत्पला मुळावकर यांनी व्यक्त केली.

जागतिक प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त डॉ. मुळावकर यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला. प्लास्टिक सर्जरी रुग्णांना त्वचा रोपण करण्यास मदत करते. शरीरावरील मांस निघून गेल्यास त्या ठिकाणी प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून किंवा फ्लॅप सर्जरीद्वारे अवयव वाचवता येत असल्याचे त्या म्हणाल्या.

प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करणार्‍यांमध्ये युवतीच अग्रेसर नसून, युवकही अशा प्रकारे सर्जरीसाठी पुढे येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉस्मेटिक सर्जरीतून व्यक्तिमत्त्वाबद्दल न्यूनगंड निर्माण न करता युवक व युवतींनी सौंदर्यवर्धनाचा विचार करण्याचा सल्लाही डॉ. मुळावकर यांनी दिला.

त्वचेच्या निर्मितीसाठी हे खावे
अपघातात शरीरातील मांसाचे नुकसान होते. त्यामुळे शरीराला नवीन मांस तयार करण्यासाठी प्रथिनांची गरज भासते. त्यासाठी रुग्णांना हाय प्रोटीन डाएटची गरज असते. यासाठी डाळी आणि कडधान्ये तूर, मटकी, सोयाबीन, राजमा हे रुग्णांना द्यावे लागतात. फारच मोठी जखम असल्यास रुग्णांना प्रोटीन मिळण्यासाठी अंडी देण्याची गरज भासते.

प्लास्टी म्हणजे रिपेअर करणे : ‘प्लास्टी’ या शब्दाचा अर्थ हा रिपेअर करणे, सुंदर बनवणे, नीट आकार देणे, नष्ट झालेला भाग पुन्हा बनवणे. म्हणून या सर्जरीला ‘प्लास्टिक सर्जरी’ म्हणतात.

यांनी करावी प्लास्टिक सर्जरी
हाताच्या पंजांना व बोटांना कापल्यास, भाजल्यास, अपघातात मांस पेशी चिरडल्यास, दुभंगलेले ओठ व टाळू, घोरण्याची समस्या, चेहर्‍यावरच्या सर्व शस्त्रक्रिया, चेहर्‍याच्या हाडांचे व जबड्यांची शस्त्रक्रिया, अपघात, भाजणे, कर्करोग झाल्यास, इन्फेक्शन झाल्यामुळे त्वचा व मांस नष्ट झाल्यास ही शस्त्रक्रिया करण्यात येते. त्वचेच्या सर्व शस्त्रक्रिया, हात व पायांच्या रक्तवाहिन्यांची इजा, पायाच्या न भरणार्‍या जखमा, बेड सोअर व सौंदर्यवर्धनासाठी केल्या जाणार्‍या सर्व शस्त्रक्रियांंचा समावेश यात होतो.

स्क्रीन ग्राफ्ट म्हणजे नक्की काय?
त्वचारोपणात मांडीच्या त्वचेचे पातळ ग्राफ्ट काढून जखमेवर रोपण केले जाते. ही मांडीची जखम दहा ते 20 दिवसांत भरते. या जखमेला भरपूर हवा लागू देण्याची गरज आहे. केवळ हवेनेच ही जखम सुकते. तसेच त्वचारोपण केलेल्या भागालादेखील हवा लागू देण्याची गरज आहे.