आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिटा राउंडमध्ये यशदीप भोगेने मारली प्रथम बाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - 14 वर्षांखालील फिटा राउंड प्रकारात अंबानगरीतील उदयोन्मुख धनुर्धर यशदीप भोगेने चारही अंतरामध्ये अचूक तीर सोडून 1440 पैकी 1321 गुणांची कमाई करून प्रथम क्रमांक अर्जित केला. यशदीप राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता तिरंदाज आहे. गुरुकुल अकादमीच्या वेदांत वानखडेने प्रथमच स्पर्धेत सहभागी होऊन नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने 1259 गुण मिळवून द्वितीय स्थानावर ताबा मिळवला. समर्थ आर्चरी अकादमीच्या सोहम गभणेने 865 गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

मुलींच्या फिटा राउंडमध्ये समर्थ आर्चरी अकादमीच्या उन्नती राऊतने 1440 पैकी 1278 गुण प्राप्त करून अव्वल स्थान पटकावले. उन्नतीनेही गतवर्षी विजयवाडा येथे झालेल्या मुलींच्या 14 वर्षांखालील गटात राष्टÑीय सुवर्णपदक हस्तगत केले होते. गुरुकुल धनुर्विद्या अकादमीची अवंती काळकोंडेने 1193 गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले. समर्थ धनुर्विद्या अकादमीच्या मधुरा धामणगावकर हिने 1167 गुणांसह तिसर्‍या स्थानावर समाधान मानले.

राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदुरकर, तुषार भारतीय यांच्या मार्गदर्शनात मुख्य प्रशिक्षक पवन तांबट, गणेश विश्वकर्मा, प्रफुल्ल डांगे, विकास वानखडे, अमर जाधव, विलास मारोडकर, समीर म्हस्के, नागराज काकडे, वैभव देशमुख, प्रेम नांदुरकर, विक्रम वाठ यांनी स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची वाशीम येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडंूच्या नावाची यादी नंतर जाहीर करण्यात येईल.
सलोनी गावंडेला धनुर्विद्येचे साहित्य भेट
आठ वर्षीय धनुर्धर सलोनी गावंडेची आर्थिक स्ेिथती बेताची असल्यामुळे तिला गुरुकुल धनुर्विद्या अकादमीतर्फे धनुर्विद्येचे संपूर्ण साहित्य भेट देण्यात आले. निवड चाचणी स्पर्धेचे औचित्य साधून तिला ही भेट देण्यात आली. वडील हातमजुरी करतात; पण मुलीची या खेळाबद्दलची आवड आणि चिकाटी बघून ते खोलापुरी गेट ते सातुर्णा येथील गुरुकुल अकादमी असे सहा कि.मी. अंतर तिची रोज सायकलने ने-आण करतात. त्यांची ही चिकाटी बघून अन् सलोनीचे कौशल्य बघून तिला प्रोत्साहन देण्यासाठी अकादमीच्या वतीने धनुर्विद्येचे महागडे साहित्य भेट देण्यात आले.

खेळाडूंची घेण्यात आली विशेष काळजी
अमरावती शहरात या वेळी प्रथमच गुरुकुल धनुर्विद्या अकादमीतर्फे खेळाडूंची विशेष काळजी घेण्यात आली. त्यांना मसाले भात, बिस्किट्स, चॉकलेट, मिनरल वॉटर आणि उन्हापासून बचावासाठी शेडची सोय पुरवण्यात आली. या दिवसांत खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी ही सुविधा पुरवण्यात आली. याची सर्वच प्रशिक्षक, पालक व खेळाडूंनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
फिटा राउंडमध्ये असतो चार अंतराचा समावेश

- फिटा राउंड प्रकारात 50 मी., 40 मी., 30 मी. आणि 20 या चार अंतराचा समावेश असतो.
- प्रत्येक अंतरासाठी एकूण 360 गुण असतात.
- अशाप्रकारे चारही प्रकारात 1440 पैकी जो धनुर्धर सर्वाधिक गुण मिळवेल, त्याला प्रथम क्रमांक मिळत असतो.
- चारही प्रकारांत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एकाग्रता आणि सरावाची आवश्यकता असते.
- कारण प्रत्येक अंतरात एकसारखी कामगिरी करणे ही फारच कठीण बाब असते.