आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगेश राणांविरुद्ध गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भूखंड प्रकरणात सेवानिवृत्त अभियंत्याची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून बांधकाम व्यावसायिक योगेश राणा व अन्य एकाविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

एका भूखंडासाठी या व्यावसायिकाने संबंधित अभियंत्याकडून रक्कम घेतली. मात्र, दोन वर्षे उलटूनही खरेदी करून दिली नाही. त्यामुळे अभियंत्याने न्यायालयात धाव घेतली होती.
अरुण रामरावजी कांडलकर (64, रा. कृषक कॉलनी, अमरावती) असे तक्रारकर्त्या सेवानिवृत्त अभियंत्याचे नाव आहे. योगेश राणा, (रा. भगीरथ विकास, भारतनगर, नागपूर) आणि डॉ. सुचितकुमार (रा. रामटेक) यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल केला आहे.
अरुण कांडलकर महावितरणमधून 2008 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांना निवृत्तीनंतर काही रक्कम मिळाली होती. 2011 मध्ये योगेश राणा यांची कंपनी मॅट्रिक्स राणा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. द्वारा भूखंड उपलब्धतेबाबत माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते. याच स्टॉलवरून कांडलकर यांनी कंपनीच्या डॉ. सुचित कुमार (रा. रामटेक) यांच्या माध्यमातून राजुरा परिसरातील एक हजार 816 वर्गफूट भूखंड प्रतिवर्गफूट दोनशे रुपये दराने विकत घेतला होता.
व्यवहारापोटी प्रारंभीच पाच हजार रुपये दिले; तसेच ठरावीक अंतराने कांडलकर यांनी मॅट्रिक्स राणा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कडे 2012 पर्यंत तब्बल एक लाख दहा हजार रुपयांचा भरणा केला होता. मात्र, त्या भूखंडाची खरेदी योगेश राणाकडून कांडलकर यांना करून देण्यात आली नाही. या व्यवहारासंदर्भात कांडलकर आणि राणा यांच्यात करारनामा झाला होता. मात्र, रक्कम देऊनही राणा यांच्याकडून खरेदी झाली नाही म्हणजेच करारनाम्याचा भंग झाला; तसेच एक लाख दहा हजार रुपये घेऊन फसवणूक केली, या प्रकरणी अरुण कांडलकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने या प्रकरणात कोतवाली पोलिसांना योगेश राणा व डॉ. सुचितकुमारविरुद्ध फसवणूक, विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून सहायक पोलिस निरीक्षक कांचन पांडे यांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक तावडे करत आहेत, अशी माहिती कोतवाली पोलिसांनी दिली आहे.