आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Municipal Corporation Not Give Amount To The Contractor

अकोला मनपाने कचरा कंत्राटदाराचे थकवले दोन कोटी रूपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट अमरावती येथील क्षितिज नागरी सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले आहे. मात्र, मागील अकरा महिन्यांपासून महापालिकेने या कंत्राटदाराला देयक न दिल्यामुळे मनपाकडे तब्बल दोन कोटी 25 लाख रुपयांचे देयक थकित आहे. त्यामुळे शहरातील कचरा उचलणार्‍या 70 कर्मचार्‍यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

15 फेब्रुवारी 2010 पासून शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट क्षितिज या बेरोजगारांच्या संस्थेला देण्यात आले आहे. कचरा उचलण्यासाठी संस्थेतर्फे 20 ट्रॅक्टर, एक जेसीबी, आवश्यकतेनुसार अधिक ट्रक व इतर वाहनांची व्यवस्था करण्यात येते. मात्र, मागील अकरा महिन्यांपासून देयके न दिल्यामुळे ट्रॅक्टरचे भाडे, डिझेल व कर्मचार्‍यांचे वेतन थकले आहे. मागील अकरा महिन्यांपासून देयक न दिल्यामुळे अनेक कर्मचारी काम सोडून गेले आहेत. यासाठी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. दोन ते तीन लाख रुपये देऊन वेळ मारून नेण्यात येत आहे.

डंपिंग ग्राऊंड साफ करून देण्याचे काम महापालिकेचे आहे. तेही संस्थेला करावे लागत आहे. त्यामुळे संस्थेला अधिक आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. थकित देयके काढून द्यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. संस्थेचे कर्मचारीही यामुळे हवालदिल झालेत.


70 सफाई कर्मचारी
शहरातील कचरा उचलण्यासाठी 70 कर्मचारी आहेत. सहा सुपरवायझर आणि इतर कर्मचारी आहेत. त्यांचा उदरनिर्वाह संस्थेवर अवलंबून आहे. संस्थेला महिन्याकाठी त्यांच्या पीएफ व वेतनाची रक्कम अदा करावी लागते. मागील नऊ महिन्यांपासून देयके नसल्यामुळे मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. प्राइज इंडेक्सननुसार दरवाढ केल्याचा करारनामा आहे. याबाबत मनपाने कधीच पुढाकार घेतला नाही, असे संस्थेचे म्हणणे आहे.

कचरा उचलणे बंद करू
महापालिकेने मागील अकरा महिन्यांपासून देयके न दिल्यामुळे काही ट्रॅक्टर बंद करण्यात आले. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. थकित देयके न काढल्यास वेळप्रसंगी कचरा उचलण्याचे काम बंद करू. दिनेश ठाकूर, क्षितिज नागरी संस्था

देयके देण्यासाठी प्रयत्न
महापालिकेची आर्थिक परिस्थिती ठीक नाही. तरीही कचरा उचलणार्‍या संस्थेचे देयके काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत. यावर तोडगा निघेल. दीपक चौधरी, आयुक्त महापालिका