आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्‍यात तडीपारीला ‘तडा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- चौकशीमधील त्रुटी आणि कायद्यातील पळवाटा शोधून गुंड प्रवृत्ती हद्दपारीच्या कारवाईतून सुटत असल्याचे मागील वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. मागील वर्षी उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे हद्दपारीचे एकूण 52 प्रस्ताव दाखल करण्यात आले. त्यापैकी 12 प्रस्ताव मंजूर झाले.

अकोला शहरात अनेक ठिकाणी गुंडांच्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्या अवैध धंद्यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गब्बर झाल्या आहेत. ‘मनी आणि मसल्स पॉवर’च्या भरवशावर टोळ्या परिसरात दहशत पसरवतात. युवती आणि महिलांची छेडखानी करणे, या टोळ्या आपला हक्कच समजतात. नखशिखांत गुंडगिरी भिनल्याने टोळ्यांना कोणी विरोधही करीत नाही.

असा होतो जिल्ह्यातून हद्दपारीचा प्रस्ताव पारित..
समाजात अशांतता निर्माण करणार्‍या गुंडांना विशिष्ट कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येते. हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव प्रथम पोलिस प्रशासन अथवा पोलिस ठाणे उपविभागीय दंडाधिकार्‍यांना सादर करतात. उपविभागीय दंडाधिकारी चौकशीसाठी प्रस्ताव उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांकडे पाठवतात. उपविभागीय पोलिस अधिकारी चौकशी अहवाल सादर करतात. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी संबंधितांना नोटीस बजावून स्पष्टीकरण सादर करण्याची संधी देतात. उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे युक्तिवाद होतो. चौकशी अहवाल, युक्तिवाद आणि संबंधितांच्या स्पष्टीकरणानंतर उपविभागीय दंडाधिकारी निकाल देतात.

प्रस्ताव खारीज होण्याची कारणे
0 पुरावे नसतानाही प्रस्ताव सादर करणे

0 साक्ष देण्यास कोणी तयार नसणे

0 साक्षीदारांच्या मनात भीती असणे

0 आरोपीविरुद्ध पुरेसे गुन्हे नसणे

0 जबाब देणारा चौकशीदरम्यान गैरहजर

सहा महिन्यांत 11 प्रस्ताव सादर
सन 2012 मध्ये एकूण 52 पैकी 12 प्रस्ताव मंजूर झाले. मात्र, जानेवारी ते जून 2013 या सहा महिन्यांच्या कालावधीत हद्दपारीचे 11 प्रस्ताव सादर करण्यात आले. यापैकी दोन प्रस्ताव खारीज झाले. उर्वरित प्रस्तावांवर निकाल प्रलंबित आहे.

प्रस्ताव स्वतंत्र अभ्यासण्याची गरज
पोलिस विभागातर्फे सादर हद्दपारीचे प्रस्ताव खारीज होण्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक प्रस्तावाचा स्वतंत्र अभ्यास करावा लागेल. मध्यंतरी पोलिस अधिकार्‍यांसाठी प्रतिबंधक, मकोका, एमपीडीअंतर्गत करावयाच्या कारवाईबाबत कार्यशाळाही घेतली होती. निकेश खाटमोडे पाटील, प्रभारी पोलिस अधीक्षक