Home | Maharashtra | Vidarva | Akola | bad situation of city in akola

अकोलेकरांचा प्रवास ‘अनफिट’, नागरिकांच्या जीवाशी खेळ

अजय डांगे | Update - Jul 17, 2013, 09:23 AM IST

अकोलेकरांच्या सेवेत असलेल्या बहुतांश शहर (सिटी) बस ‘वयस्क’ झाल्या असून, त्यांच्या तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्या, असे पत्रच उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी महापालिकेला दिले आहे.

 • bad situation of city in akola

  अकोला- अकोलेकरांच्या सेवेत असलेल्या बहुतांश शहर (सिटी) बस ‘वयस्क’ झाल्या असून, त्यांच्या तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्या, असे पत्रच उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी महापालिकेला दिले आहे. त्यामुळे शहर बसमधून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळ असल्याचेच समोर आले आहे.

  महापालिकेने अकोलेकरांसाठी दहा वर्षांपूर्वी शहर बससेवा सुरूकेली आहे. या बस सध्या वापरण्याच्या स्थितीत राहिलेल्या नाहीत, तरीही त्यांच्यावरच काम भागवले जात आहे. महापालिकेने बससेवेचे कंत्राट अकोला प्रवासी व माल वाहतूक संस्थेला दिले आहे. डाबकीरोड, बाळापूररोड, हरिहरपेठ, वाशिम बायपास, खदान, कौलखेड, खडकी, मूर्तिजापूररोड, जठारपेठ, उमरीरोड, रेल्वेस्थानक, अकोटफैल, अशोकनगर या मार्गांवर बससेवा सुरू आहे. मात्र, त्यासाठी वापरल्या जाणार्‍या बससेची स्थिती अतिशय धोकादायक झाली आहे.

  खिडक्यातून घुसतेय पाणी
  अनेक बसच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सध्या पावसाळा असल्याने प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या बसेसच्या तंदुरुस्तीची गरज आरटीओंना जाणवली. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष आहे.

  क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक..
  शहर बससेवेंर्तगत अकोल्यात एकूण 22 बसेस धावतात. यापैकी 13 बसेसची प्रवासी क्षमता चालक-वाहकासह 21 आणि उर्वरित 11 बसेसची प्रवासी क्षमता 32 आहे. मात्र, अनेक बसेसमध्ये मंजूर क्षमतेपेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. त्यामुळेही बसेस खराब होतात.

  महापालिका प्रशासनाला पत्र
  शहर वाहतूक बसेस तंदुरुस्त करून घेणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी महापालिका प्रशासनाला पत्र दिले आहे. विनय अहिरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

  अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
  शहर वाहतूक बसचे फिटनेस सर्टिफिकेट मिळण्याचे अर्ज आणले आहेत. या अर्जावर मनपा अधिकार्याची स्वाक्षरी घेवून प्रमाणपत्र लवकरच प्राप्त करून घेण्यात येईल. डी.एस. वैराळे, व्यवस्थापक, अकोला प्रवासी व माल वाहतूक संस्था.

  ‘ती’ जबाबदारी कंत्राटदाराची
  बसेसला तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळवण्याची जबाबदारी संबंधित परिवहन ठेकेदाराची आहे. त्याला आवश्यक ते निर्देश दिले आहेत. याकडे त्या कंत्राटदाराने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनिल बिडवे, सहायक आयुक्त, मनपा, अकोला.

  काय असते ‘तंदुरुस्ती’?
  प्रत्येक वाहनाला त्याचे एक आयुष्य असते. ते पूर्ण होत असताना वाहनाची योग्य ती काळजी घेतली जात नसेल तर ते ‘अपघातप्रवण’ बनते आणि रस्त्यावरून धावताना आतील प्रवाशांसाठी आणि रस्त्यावरील प्रवाशांसाठीही धोकादायक ठरते. असे वाहन ‘तंदुरुस्त’ नसते.

Trending