Home | Maharashtra | Vidarva | Akola | encroachment issue akola

शहरातील 40 टक्के रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

अजय डांगे | Update - Jul 20, 2013, 10:04 AM IST

शहरातील प्रमुख रस्त्यांवरील 40 टक्के रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे वास्तव दैनिक ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

 • encroachment issue akola

  अकोला - शहरातील प्रमुख रस्त्यांवरील 40 टक्के रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचे वास्तव दैनिक ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. दिव्य मराठी चमुने प्रत्यक्षात रस्त्याची रूंदी मोजत वाढलेला अतिक्रमणांचा आढावा घेतला. मनपा प्रशासन आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यांवरून वाहनचालकांना मार्ग काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नियमांचे होणारे उल्लंघन, रस्त्यांची दुरवस्था, साचलेले पाणी, यामुळे वाहतुकीच्या कोंडी होते.

  प्रमिलाताई ओक हॉलकडे जाणारा मार्ग
  रस्त्याची रुंदी- 12 मीटर, अतिक्रमण-पाच मीटर
  मदनलाल धिंग्रा चौकातून प्रमिलाताई ओक हॉलकडे जाणार्‍या रस्त्यावरही दुकाने थाटण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी ऑटोरिक्षाही मोठय़ा प्रमाणात उभे असतात. त्यामुळे केवळ सात मीटरच रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहतो.

  महापालिका मुख्य इमारत ते महात्मा गांधी चौक
  रस्त्याची रुंदी- नऊ मीटर; अतिक्रमण: तीन मीटर
  मनपाच्या मुख्य इमारतीच्या लगतच असलेल्या रस्त्यावर दुकाने लावण्यात येतात. या संपूर्ण रस्त्यावर तयार कापडाची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे केवळ सहा मीटर रस्ताच वाहतुकीसाठी उपलब्ध असतो.

  तहसील कार्यालयसमोर
  रस्त्याची रुंदी- 18 मीटर; अतिक्रमण 13 मीटर
  तहसील कार्यालयासमोर मोठय़ा प्रमाणात वाहने उभी करण्यात येतात. तहसील कार्यालयाबाहेर टायपिस्ट आणि मुद्रांक विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. या रुस्त्याची रुंदी 18 मीटर असून, वाहतुकीसाठी पाच मीटर रस्ताच राहतो.

  मनपा-पोलिसांमध्ये समन्वय हवा
  मनपा आणि पोलिसांनी समन्वय साधून वाहतुकीची समस्या सोडवावी. वाहतुकीसाठी अत्यंत कमी रस्ता शिल्लक राहत असल्याने वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यावरून भांडणेही होतात.’’ शशिकांत सापधरे

  हातगाड्यांमुळे ग्राहकांचा रस्ता बंद
  रस्त्यावरच हातगाड्यांवर दुकाने थाटण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे व्यापार्‍यांकडे दुकानात येणार्‍या ग्राहकाला जागाच राहत नाही.’’ मनीष हिवराळे, सराफा व्यावसायिक.

  टोईंग पथक हवे
  फेरीवाल्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. या समस्येवर मनपाने कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. तसेच टोईंग मशीनप्रणाली पुन्हा सुरू करण्यासाठी मनपाने सहकार्य करावे. त्यामुळे कुठेही वाहन उभे करणार्‍या चालकांविरुद्ध कारवाई करता येईल.’’ एस. एस. ठाकूर, शहर वाहतूक पोलिस निरीक्षक, अकोला

  पोलिसांनी द्यावे लक्ष
  मनपा फेरीवाल्यांविरुद्ध नेहमीच कारवाई करते. दर महिन्याला फेरीवाल्यांकडून सुमारे 12 हजार रुपये दंडही वसूल केला जातो. मात्र, वाहन, ऑटोरिक्षाचालक कुठेही वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.’’ विष्णू डोंगरे, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी, मनपा, अकोला

Trending