Home | Maharashtra | Vidarva | Akola | hotels near toilet, citizen's health in dangerous situation

नागरिकांचे आरोग्य धोक्यात: शौचालयाशेजारीच हॉटेल्स!

दिलीप ब्राम्‍हणे | Update - Jul 17, 2013, 09:18 AM IST

सार्वजनिक शौचालयांच्या शेजारील उपाहारगृहांमध्ये तसेच पावभाज्यांच्या गाड्यांवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात.

 • hotels near toilet, citizen's health in dangerous situation

  अकोला- शहरामध्ये मोठय़ा संख्येने सार्वजनिक शौचालये तसेच स्वच्छतागृहे आहेत. या शौचालय, स्वच्छतागृहांशेजारीच उपाहारगृहे तसेच खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने थाटली आहेत. उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने त्याच्या सेवनाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे.

  सार्वजनिक शौचालयांच्या शेजारील उपाहारगृहांमध्ये तसेच पावभाज्यांच्या गाड्यांवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवलेले असतात. या परिसरात शौचालये असल्याने तेथे घोंगावणार्‍या माशा तसेच कीटक खाद्यपदार्थांवर बसतात, त्यामुळे खाद्यपदार्थ दूषित होतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अशा उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे रोगराईस निमंत्रण मिळत आहे. शौचालयांशेजारी खाद्यपदार्थांची विक्री कशी, किंवा खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानाशेजारीच सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृह कशी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही हॉटेल्समध्ये तसेच पावभाजींच्या गाड्यांवर बंद काचांच्या पेटीमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्या जात नाहीत. प्रत्येक हॉटेलवरील खाद्यपदार्थ हे बंद काचाच्या पेटीत ठेवावे, असे अन्न औषध प्रशासनाचे निर्देश असताना या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.

  महापालिकेच्या आरोग्य विभागाला अशा उपाहारगृहे किंवा पावभाजी सेंटरवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र, बर्‍याच दिवसांपासून तशी कुठलीही कारवाई या विभागाकडून झालेली नाही. बहुसंख्येने ग्रामीण भागातील नागरिक अशा उपाहारगृहांचा किंवा भोजनालयाचा भूक भागवण्यासाठी आसरा घेतात.

  अशा खाद्यपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तत्कालीन आयुक्त बिपीन शर्मा यांनी शौचालयांशेजारील उपाहारगृहांवर ठोस कारवाई केली होती. त्यातून त्यांनी 30 लाखांचा दंडही वसूल केला होता. एवढेच नव्हे तर कारवाईत बाधा येऊ नये, यासाठी आरोग्य नियंत्रक पथकाला पोलिसांचा दर्जाही मिळवून दिला होता.

  कारवाई सुरू आहे
  शहरामध्ये काही हॉटेलमधून उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याची माहिती आहे. पावसाळा असल्याने ही मोहीम अगोदरच हाती घेण्यात आली असून, कारवाई सुरूआहे. महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनीही यामध्ये पुढाकार घेऊन कारवाई करावी. सहायक आयुक्त नि. रा. ताथोड, अन्न प्रशासन विभाग, अकोला

  रमजाननंतर कारवाई करणार
  शौचालयांजवळ असलेल्या उपाहारगृहांची माहिती लवकरच घेतली जाईल. त्यासाठी आरोग्य नियंत्रकांची चार पथके कार्यान्वित आहेत. मात्र, कारवाईला अजून सुरुवात झालेली नाही. मला पदभार स्वीकारून केवळ आठच दिवस झाली आहेत. या कामांमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक असताना तसे होत नाही. कारवाई करत असताना मध्येच फोन येतो आणि कारवाई नाइलाजास्तव थांबवावी लागते. रमजानचा महिना संपल्यावर सार्वजनिक शौचालयांशेजारी असलेल्या उपाहारगृहांवर कारवाई करू. डॉ. राजेंद्र घनबहाद्दूर, आरोग्य नियंत्रण अधिकारी, महापालिका, अकोला.

  हे खाद्यपदार्थ जीवघेणे ठरू शकतात
  उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने प्रामुख्याने अतिसार, साथीचे आजार, कॉलरा, विषमज्वर यांसारखे जीवघेणे आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी उघड्यावरील तसेच पावसाळय़ात बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डॉ. कमलकिशोर ढोले, अकोला

Trending